अजित पवारांनी मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांना मस्साजोग इथल्या लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अजित पवारां समोर गावकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवाय धनंजय मुंडे यांची मंत्रिंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली. त्याच वेळी गावातील महिलांनीही अजित पवारां बरोबर बोलण्याचा प्रयत्न केला. पण अजित पवारांनी आपलं काही न ऐकता ते निघून गेले असा आरोप गावातील महिलांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवार मस्साजोगमध्ये आले होते. त्यावेळी गावातल्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. अजितदादां बरोबर आम्हाला बोलायचे होते. आम्ही सर्वजण दु:खात आहोत. सर्वजण भयभित आहोत. आमच्या मुली शाळेत जातात. आम्ही कामाला जातो. पण आमच्या मनातली भिती जात नाही. आम्ही अजित पवारांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना आवाज दिला. पण ते थांबले नाही असा आरोप गावातल्या महिलांनी केला.
आम्हाला ते लाडक्या बहिणी बोलतात. पण या लाडक्या बहिणींसाठी दोन मिनिटे दादांना नव्हती. त्यांना दोन मिनिट वेळ का देता आला नाही असा प्रश्न या महिलांनी केला. आमचं म्हणणं अजित पवारांनी ऐकायला पाहीजे होतं. पण त्यांनी आमचे काही एक ऐकलं नाही. दादांची लाडकी बहिण विधवा झाली आहे. अशा वेळी अंधारात जावून त्यांचे सांत्वन करणं हे कोणालाही पटलं नाही. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारहाण झाली. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ते जर त्यांच्या पत्नी आणि आई पर्यंत जर गेले तर त्यांचा आक्रोष अजितदादांना पाहायचा आहे का असा प्रश्नही त्यांनी केला.
काही महिला तर जर आमचं म्हणणं ऐकून घ्यायचचं नव्हतं मग ते आलेच कशाला होते असा प्रश्न केला. तुम्हाला आमचा अपमान करायचा होता का? त्यासाठीच तुम्ही इथे आला होता का? अशी विचारणाही अजित पवारांना महिलांनी केली. काही झालं तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहीजे हे आम्हाला त्यांना सांगायचे होते असं या महिला सांगत होत्या. त्या ज्यावेळी बोलत होत्या त्यावेळी त्यांचा राग पहाण्यासारखा होता.
एकीकडे महिला आक्रमक झाल्या असताना दुसरीकडे पुरूषांनी अजित पवार जात असताना जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा अशी मागणी केली डीएमला मंत्रिपदावरून काढा असं काही जण म्हणत होते. शिवाय आरोपीला तात्काळ अटक केली पाहीजे. या प्रकरणाची फास्टट्रॅक समोर सुनावणी होवून आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणीही गावकऱ्यांनी केली. अजित पवार इथं आले पण आरोपीबद्दल एकही शब्द बोलले नाहीत. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. अशा वेळी तुम्ही आरोपी बद्दल बोलायला पाहिजे होतं. दरम्यान या केसचा निकाल लागत नाही तो पर्यंत धनंजय मुंडेंची हाकालपट्टी करावी अशी मागणी हीगावकऱ्यांनी केली. पण आमचे काही ऐकून न घेता त्यांनी काढता पाय घेतला असा आरोप गावकऱ्यांनी केला.