राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का देत जोरदार मुसंडी मारली होती. शरद पवारांनी 8 जागा जिंकल्या होत्या. तर अजित पवारांच्या पदरात अवधी एक जागा आली होती. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ही पराभूत झाल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या गटातून शरद पवारांच्या पक्षात जाणाऱ्यांची रिघ लागली होती. पण निवडणुकीनंतर संपुर्ण चित्रच पालटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यात काही खासदार ही अजित पवारांच्या गळाला लागणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र या शक्यता शरद पवारां बरोबर अजित पवारांनीही फेटाळली होती. पण त्यात आता शरद पवारांच्या पक्षातील एक विद्यमान आमदार शरद पवारांची साथ सोडणार आहेत. त्यांनी तसा निर्णय घेतला असून ते अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश सोहळा शिर्डीमध्ये होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात प्रवेश करणारे हे पहिले आमदार ठरणार आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Political news:'सरकारने आम्हाला माती खायला लावू नये' मुनगंटीवारांचे सुर का बदलले?
त्यांचं नाव सतीश चव्हाण आहे. सतीश चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत. ते पदविधर मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवाय गंगापूर विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. त्यावेळी अजित पवारांनी त्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबीत केलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत सतीश चव्हाण यांना पराभव स्विकारावा लागला.
पराभवानंतर आता सतीश चव्हाण यांनी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचा आदर करत त्यांच्यावर असलेल्या सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई ही मागे घेण्यात आली आहे. गंगापूर विधानसभा मतदार संघ हा भाजपच्या वाट्याला होता. त्यामुळे सतीश चव्हाण यांना तिथून उमेदवारी मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे चव्हाण हे नाराज होते. शेवटी त्यांनी शरद पवारांच्या पक्षात जात निवडणूक लढवली होती. मात्र पराभवानंतर ते पुन्हा अजित पवारांकडे आले आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश शनिवारी शिर्डीत होत आहे. शरद पवारांना हा धक्का मानला जात आहे.