Sharad Pawar on Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांना सोमवारी (19 मे) अप्रत्यक्षपणे फटकारले. भारताच्या जागतिक स्तरावरील प्रयत्नांमध्ये 'स्थानिक पातळीवरील राजकारण' आणू नये, असा सल्ला त्यांनी दिला. यापूर्वी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केंद्राने विविध देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवण्याच्या निर्णयावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखील संयुक्त राष्ट्रात शिष्टमंडळ पाठवले होते. त्याचे आपण सदस्य होतो, याची आठवण पवार यांनी करुन दिली.
बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, 'आंतरराष्ट्रीय प्रश्न उद्भवल्यानंतर पक्षीय राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. केंद्र सरकारनं काही शिष्टमंडळे तयार केली आहेत. या शिष्टमंडळावर काही देशांमध्ये जाऊन पहलगाम हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या कुरापतींवर भारताची भूमिका मांडण्याची जबाबदारी सोपवली आहे.
( नक्की वाचा : PM मोदींनी थरुर आणि ओवैसींची निवड का केली? पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा काय आहे प्लॅन? )
काय म्हणाले होते राऊत?
यापूर्वी संजय राऊत यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी केंद्र सरकारनं केंद्र सरकारने विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवण्याच्या निर्णयावर बहिष्कार घालावा, असं आवाहन केलं होतं. ही शिष्टमंडळं सरकारची पापं आणि गुन्हे यांचं समर्थन करतील, असा दावा राऊत यांनी केला होता.
संजय राऊत यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण, त्यांच्या पक्षाचा शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक सदस्य या शिष्टमंडळात आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण या मुद्द्यात आणू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
राज्य विधानसभेत विरोधी पक्षांमध्ये असलेल्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा समावेश आहे. पण, या मुद्यावर प्रमुख पक्षांमधील मतभेत उघड झाले आहेत.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचा सामना करण्याचा भारताचा निर्धार व्यक्त करण्यासाठी 51 राजकीय नेते, संसद सदस्य आणि माजी मंत्री यांची सात शिष्टमंडळं केंद्र सरकारनं तयार केली आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एसपी) च्या कार्यकारी अध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या शिष्टमंडळांपैकी एका शिष्टमंडळाचा भाग आहेत, तर प्रियांका चतुर्वेदी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.