राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर पवार कुटुंबातही फुट पडल्याची चर्चा होती. पण वेळोवेळी हे कुटुंब एकत्र येताना दिसलं आहे. मग कधी सार्वजनिक कार्यक्रम असो की मग कौटुंबिक कार्यक्रम. ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले त्यावेळी राजकीय चर्चांना मात्र नक्कीच उधाण आलं. आता परत एकदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या सर्वसाधारण सभेला या दोघांनी हजेरी लावली. दोघे ही एकाच मंचावर दिसले. एवढेच काय तर राष्ट्रवादीचे अनेक नेते बऱ्याच दिवसानंतर एकत्र पाहायला मिळाले. या सभेनंतर शरद पवार आणि अजित पवारांनी बंद दाराआडा चर्चा केल्याने तर सर्वांच्याच भूवया उंचावल्या. त्यामुळे काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का या चर्चेला आता परत एकदा उचल खालली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची सर्वसाधारण सभा होती. सभे ठिकाणी शेजारी ठेवलेल्या दोन खुर्च्या होत्या. एक खुर्ची अजित पवारांची तर दुसरी खुर्ची शरद पवार यांची होती. त्यामुळे हे दोघे एकत्र येणार का, हा प्रश्न या दोन खुर्च्यांभोवती फिरत होता. त्यामुळे काका-पुतण्या भेटणार का? बाजूबाजूला बसणार का? एकमेकांशी काय बोलणार? असे तमाम प्रश्न रांगेत उभे असतानाच होते. त्याच वेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आले आणि दोघांच्या मध्ये बसले. आसन व्यवस्था निरखून पाहिली तर शरद पवारांच्या बाजूला दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांच्या बाजूला जयंत पाटील बसलेले होते. विशेष म्हणजे दादांचं माझ्यावर विशेष लक्ष असतं असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांशी अजित पवारांच्या बराच वेळ गप्पा ही सुरू होत्या. त्या कुणाच्या नजरेतून सुटल्या नाहीत.
कार्यक्रम संपला, पण पवार काका-पुतण्याची गोष्ट संपली नाही. उलट ती पुढे सुरू झाली. कारण कार्यक्रमानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा झाली. व्यासपीठावर एकमेकांकडे न बघणारे आणि बोलणारे काका पुतण्या दार लावून अर्धा तास बोलले. बंद दाराआड काय झालं हे विचारल्यावर दादा म्हणाले वेगवेगळ्या विभागांसंदर्भात पवारांशी चर्चा केली. पवारांशी मी कधीही बोलू शकतो अजित पवार आणि शरद पवार भेटले की दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू होते. असंही ते यावेळी म्हणाले. तर कुटुंब एकत्र असणं कधीही चांगलं असं रोहित पवारही यावेळी म्हणाले. तर त्यांच्या संस्था एकच आहेत, ते भेटत असतात असं संजय राऊतही या भेटीवर म्हणाले.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांची बऱ्याच वेळा भेट झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर वाय. बी चव्हाण सेंटरच्या बैठकीनंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेले होते. पुण्यात उद्योजक चोरडियांच्या घरीही पवार काका पुतण्याची भेट झाली होती. त्यावेळी अजित पवार गाडीतून आडवे झोपून गेल्याची चर्चा होती. पुण्यात आणि बारामतीतल्या कार्यक्रमातही अजित पवार-शरद पवार एकाच व्यासपीठावर आले होतं. मात्र एकमेकांशी बोलणं या दोघांनीही टाळलं होतं. 12 डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेतली होती. गेली दोन वर्ष दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंब एकत्र ही आलं होतं.
विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आमचं कुटुंब एकच, असं पवार कुटुंबीय सांगत असतात. वर्षभरात दोघे एकत्र येतील, असा विश्वास ही आशाताई पवारांनी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केला होता. त्यातच पवार आणि ठाकरे केंद्रात भाजपसोबत जातील, असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. हे सगळं लक्षात घेता काका-पुतण्याच्या या बंद खोलीतल्या चर्चेला महत्त्व येत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जाहीर कार्यक्रमात एकत्र आल्यावर शरद पवार आणि अजित पवार एकमेकांशी बोलणं टाळतात, पण खाजगीत हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात असतात हे लपू शकलेलं नाही. या बंद दाराआडच्या चर्चांमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाला बऱ्याच वेळा कलाटणी मिळाली आहे. त्यामुळेच दोन्ही पवारांनी दार लावून बोलणी सुरू केली की राज्यात नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू होतात. तशीच आताही सुरू झाली आहे.