Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, असं वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झालं होतं. पण, हे वृत्त म्हणजे खोडसाळपणा असल्याचं स्पष्टीकरण पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.
मा. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे , हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
त्यामुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचे वृत्त हे निराधार असून शरद पवारांनी अद्याप भाकरी फिरवली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
काय होती चर्चा?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये अखेर खांदेपालट करण्यात आल्याची चर्चा शनिवारी (12 जुलै) सकाळपासून सुरु होती. जयंत पाटील यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. यापूर्वी 10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापनदिनीच जयंत पाटील यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मला पवार साहेबांनी संधी दिली. सात वर्षांचा काळ दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली.
( नक्की वाचा : Sanjay Shirsat: 'ते घरं माझं, बॅग माझी आणि पैसे....' Viral Video वर संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण )
शशिकांत शिंदे काय म्हणाले?
दरम्यान, या बातम्यांवर शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू आहे हे माझे भाग्य आहे.15 जुलैला ते जाहीर होईल. मला जर संधी मिळाली तर नक्कीच पक्ष वाढविण्यासाठी मी प्रयत्न करेन. माझा लोकसभेला,विधानसभेला पराभव होऊनदेखील मला संधी मिळते आहे हे माझं भाग्य असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष 15 जुलै रोजी निश्चित होण्याची शक्यता आहे.