एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न केले. शिवाय त्यावेळी त्यांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला, अशी कौतूकाची थाप शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना दिली. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरणानंतर शरद पवार बोलत होते. दिल्लीत हा सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादीत्य शिंदे ही उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतूक केले. एकनाथ शिंदे यांनी आपली कारकीर्द ठाणे महापालिकेपासून सुरू केली. ज्या दिग्गजांनी ठाण्यात चांगलं काम केलं ते काम एकनाथ शिंदे यांनी पुढे नेलं. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचा विकास कसा होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. हे करत असताना त्यांनी कधी पक्षाचा विचार केला नाही. सर्वां बरोबर त्यांनी सुसंवाद ठेवला. वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक त्यांनी त्यांच्या काळात केली.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई,वसई विरार हा झपाट्याने नागरिकरण होणारा भाग आहे. या भागाच्या प्रश्नांची जाण असलेला नेता कोण असेल याची माहिती घेतली, तर तो नेता एकनाथ शिंदे आहे. असं ही शरद पवार यावेळी म्हणाले. या भागातल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असंही ते म्हणाले. शिंदेंकडून शिंदेंना शिंदेंच्या जावया मार्फत हा पुरस्कार दिला जात असल्याबद्दलही शरद पवारांनी यावेळी आनंद व्यक्त केला. हा एक योगायोग असल्याचेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Bangkok tourism: बँकॉकला पर्यटक नेमकं कशासाठी जातात? काय आहे तेथील वैशिष्ट्य?
सातारा जिल्ह्याने बरेच मुख्यमंत्री दिले आहेत. पहिले मुख्यमंत्री हे धनजीभाई कूपर हे होते. ते मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. पण यावेळी शरद पवारांनी एक आठवण आवर्जून करून दिली. ते म्हणाले यात एक नाव अजून आहे. सातारा जिल्ह्यातील एक नाव आहे ते म्हणजे नांदवे. हे गाव शरद पवारांचं गाव आहे. त्यामुळे मी पण सातारा जिल्ह्याचा आहे असं शरद पवारांनी आवर्जून सांगितलं. मी ही सातारचा तुम्ही सातारचे हे पवारांनी सांगण्या मागचा अर्थ काय अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - Raigad Crime: अरेच्चा! पोलिसच निघाले दरोडेखोर, 1 कोटी 50 लाख लांबवले, पण पुढे...
दरम्यान साहित्य समेलन दिल्लीत होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर दिल्लीत साहित्य संमेलन झालं होतं. त्याला पंडीत जवाहरलाल नेहरू आले होते. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. अशी आठवणही सांगितली. त्यामुळे राजधानीत राहाणाऱ्या मराठी माणसासाठी हे संमेलन पर्वणी असल्याचे ते म्हणाले. या मुळे दिल्लीकर मराठी माणूस खुषीत आहेत. ते या संमेलनात पंतप्रधानांच्या भाषणाची वाट पाहात आहेत. सध्या दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाची चर्चा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.