अमजद खान
शिवसेना शिंदे गटात सध्या काय सुरू आहे अशी विचारणा करण्याची वेळ आली आहे. कल्याणमध्ये शिंदे गटात वाद थांबण्याचे नाव घेत नाही. नुकतेच कल्याण पश्चिमेला शिंदे शिवसेनेच्या दोन गटात वाद झाला होता. महिला कार्यकर्त्याने भर रस्त्यात शहर उपप्रमुखाच्या कानाखाली लगावली होती. हा वाद शांत होत नाही तोच कल्याण पूर्वेला ही शिंदे सेनेच्या दोन गटात जोरदार राडा झाला आहे. विशेष म्हणजे पोलिसां समोरच दोन गट एकमेकांना भिडले. तिथेच फ्री स्टाईल हणामारी झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण पूर्वेत एका प्रभागात पाणी प्रश्नाचा वाद इतका विकोपाला गेला की, शिवसेना शिंदे गटाचे पदादिकारी पोलिस ठाण्यात एकमेकांना भिडले. या राड्यात शिवसेना उपशहर प्रमुख दिलीप दाखिनकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दिलीप दाखिनकर यांच्या कार्यकर्त्यावर माजी नगरसेविकेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. काल कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटाच्या राणी कपोते आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यात राडा झाला होता. या राड्यामागे काही कारण दिले जात असले तरी, या दोन्ही राड्यात एक बाब लक्षात ये, ती म्हणजे प्रभागात नगरसेवक निवडणूकीसाठी हा वाद सुरु आहे.
कल्याण पूर्वेत शास्त्रीनगर परिसरात पाण्याची समस्या आहे. यासाठी स्थानिक माजी नगरसेविकेकडून प्रयत्न सुरु होते. शिंदे सेनेचे उपशहर प्रमुख दाखिनकर यांचे म्हणणे आहे की, त्यांनी पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. या कारणावरुन वाद झाला होता. हे दोन्ही पदाधिकारी शिंदे गटाचे असल्याने हा वाद कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पोहचला. हे प्रकरण सोडविण्यासठी प्रयत्न सुरु झाले. मात्र थोड्याच वेळात कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील स्वागत कक्षात पोलिसांसमोरच पदाधिकारी एकमेकांना भिडले.
दिपील दाखिनकर यांचे म्हणणे आहे की, मल्लेश शेट्टी यांनी त्यांना मारहाण केली आहे. त्यांच्याकडून नेहमीच दादागिरी केली जाते. आम्ही एका पक्षाचे असलो तरी या घटनेसाठी माफी नाही. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन न्याय मिळाला पाहिजे. तर मल्लेश शेट्टी यांचे म्हणणे आहे की त्यांच्या भावजईसोबत दिलीप दाखिनकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केले. चूक त्यांची आहे. माझ्याकडून कोणाला मारहाण झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या या दोन्ही गटाकडून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेत राणी कपोते आणि मोहन उगले यांच्यात जो वाद झाला. त्या वादाचे खरे कारण प्रभागात वर्चस्वाची लढाई आणि उमेदवारी मिळविण्यासाठी आहे. दुसरीकडे कल्याण पूर्वेतील प्रकरण हे देखील त्याच पठडीतले आहे. दाखिनकर आणि माजी नगरसेविका एकाच प्रभागातील असल्याने तिथेही वर्चस्वाची लढाई आहे. या घटनेतून हेच सिद्ध होत आहे की येणाऱ्या महापालिका निवडणूकीत शिंदे गटातील पदाधिकारी एकमेकांना आव्हान देणार. त्याचेच प्रतिबिंब सध्या दिसून येत आहे. यातून राडे ही होत आहेत.