Eknath Shinde Speech: शिवसेना पक्षाच्या 60 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेच्या हिरक महोत्सवाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ठाकरे गटाकडून केल्या जाणाऱ्या टीकेला चोख उत्तर देताना, तुम्ही आम्हाला काय तुडवणार, हिंमत असेल तर समोर या, जर तुम्ही समोर आलात तर हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवणार नाहीत, असा थेट आणि कडक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणाले शिंदे?
शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांच्या विरोधात 'ऑपरेशन तुडवा' ची घोषणा केली आहे. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले की,हे लोक आता आम्हाला तुडवण्याची भाषा करत आहेत. पण लक्षात ठेवा, तुडवायला पाय लागतात आणि जर तुम्ही समोर आलात, तर समोर बसलेले हे लाखो शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? सेनापतीने घरात बसून राजकारण करायचे नसते, तर मैदानात उतरून लढावे लागते. हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे आणि शिवसैनिकांवर संकट आले तर तो छातीचा कोट करून सर्वात पुढे उभा राहील.
( नक्की वाचा : ठाकरे गटाचा सातवा खासदारही फुटला होता, थेट मागितले होते मंत्रिपद; रामदास कदम यांचा सर्वात मोठा दावा )
पिक्चर अभी बाकी आहे...
काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर बोलताना शिंदे म्हणाले की, गेल्या 2 दिवसांपासून काही कुत्रे झुंडीने भुंकत आहेत, पण वाघ नेहमी एकटाच येतो. कुत्रे फक्त भुंकतात, मात्र टायगर थेट शिकार करतो. ही बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघेंच्या विचारांची खरी शिवसेना आहे.
आतापर्यंत जे काही घडले तो फक्त ट्रेलर होता, खरा पिक्चर अजून बाकी आहे, पुढे पुढे बघा काय होतेय. मी डॉक्टर नसलो तरी राजकीय ऑपरेशन अचूक करतो आणि असे ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही, असा टोला त्यांनी लगावला.
( नक्की वाचा : Sanjay Raut: संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'ला शिंदेच्या शिलेदाराचे आव्हान; सुरक्षेसाठी शिवसैनिक बनणार ढाल )
सातबाऱ्यावर नाव लावून कुणी वारस होत नाही
उद्धव ठाकरेंच्या घराणेशाहीवर थेट निशाणा साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, केवळ रक्ताचे नाते सांगून किंवा ७ बाऱ्यावर नाव लावून कोणी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार होऊ शकत नाही.
शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, तर तो शिवसैनिकांच्या काळजाचा तुकडा आहे. बाळासाहेबांच्या हयातीत ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा बाळासाहेबांनी नेहमी तिरस्कार केला, त्यांच्याच गळ्यात तुम्ही सत्तेसाठी हार घातले. उलट, ज्याने शिवसेनेचा भगवा काँग्रेसच्या विळख्यातून मुक्त केला, त्याच्यावरच तुम्ही टीका करत आहात.
सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी
पक्ष म्हणजे केवळ आमदार, खासदार किंवा मंत्री नसून तळागाळातील कार्यकर्ता हीच खरी संपत्ती आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. माझ्याकडे येण्यासाठी कोणताही वशिला, मर्सिडीज किंवा पैसे लागत नाहीत. म्हणूनच आपण भीमाच्या लेकीला आणि ज्योती वाघमारे सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला थेट राज्यसभेवर पाठवले. माझ्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खोडा घालण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत, पण आमची युती खुर्चीसाठी झालेली नाही. जे लोक लपूनछपून तिकडे गोष्टी सांगतात, तेच लोक परत येऊन मला सगळी माहिती देतात, असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदे यांनी केला.