अमजद खान
केडीएमसीत शिवसेनचा महापौर बसला पाहिजे असे मी बोलत नाही. महायुतीचा महापौर बसला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी काम केले पाहिजे. युती धर्म पाळला पाहिजे असे विधान कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केडीएमसी महापौर पदाबाबत केले आहे. भाजपचा महापौर बसणार असा भाजपचा दावा आहे, असा प्रश्न विचारल्यावर खासदार शिंदे यांनी हे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमधील एका पक्ष प्रवेश कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महापौर पदाबाबत मोठे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर शिंदे बोलत होते.
केडीएमसीच्या विकासाचे ग्रहण दूर करायचे असेल तर केडीएमसीत भाजपचाच महापौर बसला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी काम केले पाहिजे असे विधान चव्हाण यांनी केले होते. काही दिवसापूर्वी डोंबिवलीतील चार माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. इतकेच नाही तर असंख्य कार्यकर्ते प्रवेश करीत आहे. पुढेही पक्ष प्रवेश होणार आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट ही कुठेही कमी पडताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शिंदे यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवलीतील अन्य पक्षाती अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
नक्की वाचा - Good News: महिलांना 'या' रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, कुठे सुरू झाले असे हॉस्पिटल?
या पुढेही शिंदे गटात इनकमिंग सुरुच राहणार असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा कल्याण डोंबिवलीतील विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांवर डोळा आहे. माजी नगरसेवकांना कसे आपल्या पक्षात खेचायचे ही रणनिती दोन्ही पक्षांकडून आखली जात आहे. आता या दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी अद्याप फोडले गेलेले नाहीत. दोन्ही कडून दावा केला जात आहे की एकमेकांचे कार्यकर्ते फोडणार नाही. हे राजकारण आहे. कधी काय होईल हे काही सांगता येत नाही.
सद्या खासदार शिंदे यांनी केडीएमसी महापौर पदाबाबत मोठे विधान केले आहे. गणेश उत्सवानिमित्त खासदार शिंदे यांच्याकडून शेकडो बसेस कोकणात सोडल्या गेल्या आहेत. डोंबिवलीत आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्या प्रभागातून मोठ्या प्रमाणात कोकणात बसेस रवाना केल्या गेल्या. या वेळी खासदार शिंदे यांना प्रश्न विचारला गेला की, केडीएमसी महापौर पदावर भाजप दावा करीत आहे. या प्रश्नावर शिंदे यांनी सांगितले, केडीएमसीत शिवसेनचा महापौर बसला पाहिजे असे मी बोलत नाही. महायुतीचा महापौर बसला पाहिजे असं म्हणत त्यांनी चव्हाणांना युती धर्माची आठवण करून दिली.