- शिवसेना शिंदे गटाने राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्याने पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे
- भाजपने एकनाथ शिंदेंना दिलेला राज्यपालपदाचा आश्वासन पाळले नाही असा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे
- नेते आनंदराव अडसूळ यांनी पक्षातील नाराजी व्यक्त करत उमेदवारीसाठी स्वतः इच्छुक असल्याचेही स्पष्ट केले
Political news: राज्यसभेसाठी शिवसेना शिंदे गटाने ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर होताच पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. काही इच्छुक नेत्यांनी आपली खदखद बोलून दाखवली. शिवाय भाजपवर ही टिकेची झोड उठवली. भाजपने एकनाथ शिंदें समोर दिलेला शब्द पाळला नाही. एक प्रकारे फसवणूक केली असा थेट आरोप शिंदेंच्या अगदी जवळच्या नेत्याने केला आहे. पक्षात अनेक जण नाराज असल्याचं ही ते सांगायला विसरले नाहीत. या शिवाय त्यांनी आतापर्यंत काय काय आश्वासनं दिली गेली होती याची यादीच वाचली आणि आपल्या नाराजीला वाट करून दिली.
शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे. शिवाय आपल्या पक्षावर ही नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले नाराजी ही मनात ठेवायची की बाहेर काढायची हा प्रश्न आहे. नाराजी ही सर्वांकडेच असते. ज्या वेळी एखादी गोष्ट अपेक्षित असताना ती मिळत नाही त्यावेळी नाराजी ही असतेच. मी पक्षाचा जबाबदार नेता आहे. त्यामुळे यावर अधिक काही बोलणार नाही असं सांगत असताना ते बरच काही बोलून गेले. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी का दिली याबद्दल आपण काही बोलणार नाही असं ही ते म्हणाले. तो पक्ष नेतृत्वाचा निर्णय आहे असं अडसूळ म्हणाले. मात्र यासाठी आपण इच्छुक होतो असं ही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकी वेळी भाजपने आपल्याला राज्यपालपदाचा शब्द दिला होता. हा शब्द अमित शाह यांनी दिला होता. त्यांनी तसे लेखी आश्वासन ही दिले होते. पण तो शब्द पाळला गेला नाही. भाजपने राज्यपालपद नाही तर किमान त्यांच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी ही दिली पाहीजे होती असं अडसूळ म्हणाले. आपल्याला जे आश्वासन दिले होते त्याबाबत एकनाथ शिंदे यांना आपण वारंवार बोललो होतो. ते या सर्व गोष्टींचे साक्षिदार आहेत. अमित शहा यांनी स्वत: लेखी आश्वासन दिली होते. तरी ही त्याचे पालन होत नसेल तर काय बोलणार अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेत राज्यसभेसाठी अनेक जण इच्छुक होते. त्यात गजानन किर्तीकर, राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा होती. त्यात अनंतराव अडसूळ यांनी ही राज्यसभेवर जाण्याची तयारी चालवलेली होती. पण या पैकी एकाला ही संधी मिळाली नाही. ज्योती वाघमारे यांना शिवसेनेचे उमेदवार करण्यात आले. त्यामुळे अडसूळ यांची नाराजी बाहेर आली आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत ही वेगळी असते असं ही ते म्हणाले. पण आपली नाराजी व्यक्त करून मी पक्षाची बदनामी करणार नाही असं ही अडसूळ यांनी सांगितलं. या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.