मागील काही दिवसांपासून ठाकरे गटातील अंतर्गत वादामुळे चर्चेत आलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे आज मात्र वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळाले. अंबादास दानवेंवर उघडपणे टीका करणारे चंद्रकांत खैरे यांनी आज रविवारी मात्र दानवेंचा हात पकडत ठेका धरला होता. संभाजीनगर शाखेच्या वर्धापन दिना निमित्त हे दोघे एकत्र आले आहे. या दोघांना एकत्र पाहून शिवसेना ठाकरे गटातल्या शिवसैनिकांनाही हायसे वाटले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
8 जून 1985 रोजी मराठवाड्यात सर्वात पहिली शिवसेनेची शाखा स्थापन करण्यात आली होती. ही शिवसेनेची शाखा संभाजीनगरमध्ये उघडण्यात आली. त्यामुळे आज शाखेचा वर्धापन दिन होताय या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले होते. त्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे सहभागी झाले होते.
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचवेळी संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले गेले होते. दरम्यान बिळाची नागीण निघाली गाणं लागताच खैरे आणि दानवेंनी ठेका धरला. खैरे आणि दानवेंचा हाटके अंदाज पाहताच कार्यकर्त्यांनी देखील मनसोक्त डान्स केला.
मातोश्रीपर्यंत जाऊनही न मिटलेला दानवे-खैरेंचा वाद सर्वानाच माहीत आहे. पण अचानक झालेलं हे मनोमिलन सर्वांना धक्का देणारा ठरला आहे. याची चर्चा आता राजकीय वर्तूळातही रंगली आहे. हे मनोमिनल गाण्यावर ठेका धरण्यापूरता होतं की संभाजीनगरच्या राजकारणात हे मनोमिलन दिर्घकाळ चालेल याची ही चर्चा रंगली होती. पण हा क्षण शिवसैनिकांना मात्र दिलासा देणारा ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.