- शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत
- सरनाईक म्हणाले की पाणी टंचाईच्या काळात मेहता यांनी अश्लील पूल पार्टीचे आयोजन केले आहे
- मेहता यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे मिरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे
शिवसेना नेते अन् मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात विस्तव ही जात नाही. दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत या गोष्टी पाहील्या गेल्या. वास्तविक मिरा भाईंदरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशीच वातावरण आहे. त्यात आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्या बाबतचा एक व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
पावसाचे अजून ही आगमन झाले नाही. मान्सून लांबला आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर निशाणा साधला आहे. ते लिहितात संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण करतोय. पाण्याविना शेतकरी येथे होरपळत आहे. मिरा भाईंदरकरांचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. अशी भीषण अवस्था असताना माझ्या मतदार संघातील आमदार नरेंद्र मेहता यांनी सेवन इलेव्हन क्लबमध्ये अश्लील पूल पार्टीचे आयोजन केले आहे. हे म्हणजे रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत होता अशी स्थिती झाली आहे. काय म्हणावे या व्यापारी वृत्तीला?
अशा पद्धतीचे ट्वीट परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटनंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या आरोपानंतर आता भाजप आमदार नरेंद्र मेहता काय प्रत्युत्तर देता ते ही पाहावं लागणार आहे. कारण ही तसचं आहे. प्रताप सरनाईक यांनी ज्या ज्या वेळी मेहता यांना लक्ष केलं त्या त्या वेळी त्यांनी पुढे येवून त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. पण आता थेट त्यांच्या व्यवसायावर आघात करण्यात आला आहे. शिवाय राज्यातल्या पाणी टंचाईची जोड त्याला देण्यात आली आहे. सरकारसाठी ही बाब अडचणीची मानली पाहीजे.
ज्या पूल पार्टीबाबत प्रताप सरनाईक बोलत आहे ती 27 जून ला होणार आहे. त्याची जोरदार तयारी ही सुरू आहे. त्याचे जाहीरात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. शिवाय या पार्टीला देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी म्हणजेच बिगेस्ट पूल पार्टी असं नाव देण्यात आलं आहे. या पार्टीमध्ये इंटरनॅश्नल डी.जे. प्लेअर येणार आहेत. या पार्टीत सहभागी होण्यासाठी पास बुक करा अशी ही जाहीरात करण्यात आली आहे. त्याचाच व्हिडीओ प्रताप सरनाईक यांनी शेअर केला आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.