शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर पक्षाच्या उपनेतेपदाची राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते नाराज होते. शिवाय ते पक्षाला जय महाराष्ट्र करणार याची चर्चाही सुरू होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यांची नाराजी दुर करण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं नाही. शेवटी त्यांनी पक्षाच्या उपनेतेपदाची राजीनामा दिला आहे. ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. असं असताना त्यांच्या प्रवेशाला स्थानिक पातळीवर विरोध होत आहे. त्यामुळे एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या 35 वर्षापासून आपण शिवसेनेत काम करत आहोत. पक्षानेही आपल्याला वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी दिली. 2024 ची विधानसभा निवडणूक आपण राजापूर विधानसभा मतदार संघातून लढवली. त्यात आपला पराभव झाला. त्याची नैतिक जबाबदारी स्विकारत आहे. मतदार संघात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अशात संघटनात्मक बांधणीवर लक्ष देणं गरजेचे आहे. अशा स्थितीत आपण उपनेतपदाला न्याय देवू शकत नाही. शिवाय पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे राजन साळवी यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातमी - Sanjay Raut : महाविकास आघाडीत भूकंप, संजय राऊतांची शरद पवारांबद्दल जाहीर नाराजी
राजीनामा दिल्यानंतर राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्याला शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही दुजोरा दिला आहे. साळवी यांचे शिवसेनेत स्वागत आहे असे सुचक वक्तव्य त्यांनी केले आहे. तर साळवी हे नाराज होते. त्यांची नाराजी दुर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण ती दुर होवू शकली नाही असं शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सांगितले. साळवी हे आधी भाजपमध्ये जाणार होते. पण ऐन वेळी काय झालं माहित नाही. तसं आता शिंदे गटात प्रवेश करताना होवू नये म्हणजे झालं असंही ते म्हणाले.
एकीकडे राजन साळवी यांचा शिवसेना शिंदे गटातला प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्याच वेळी त्यांच्या प्रवेशाला लांजा तालुका कार्यकारिणीने विरोध केला आहे. त्यामुळे साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या अगोदर राजापूर विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापलं आहे. राजन साळवी यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ नये असा लांजा तालुका कार्यकारिणीने ठराव केला आहे. तसेच वरिष्ठ स्तरावरून पक्षप्रवेश होत असल्यास स्थानिक आमदार किरण सामंत यांना विश्वासात घेऊन हा पक्षप्रवेश व्हावा असं लांजा तालुका शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी म्हटलं आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघात राजन साळवी यांनी शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांना मोठा मनस्ताप दिला आहे. राजन साळवी यांच्या मागे आता निष्ठावान शिवसैनिक नाही. त्यामुळे राजन साळवी यांना शिवसेनेत पक्षप्रवेश देऊ नये असा कार्यकारिणीचा ठराव असल्याचं देसाई यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यांचा शिंदे गटाच्या किरण सामंत यांनी पराभव केला होता. पराभव झाल्यानंतर राजन साळवी हे पक्ष बदल्याच्या तयारीत होते. आता त्यांनी निर्णय घेतला आहे.