![Sanjay Raut : महाविकास आघाडीत भूकंप, संजय राऊतांची शरद पवारांबद्दल जाहीर नाराजी Sanjay Raut : महाविकास आघाडीत भूकंप, संजय राऊतांची शरद पवारांबद्दल जाहीर नाराजी](https://c.ndtvimg.com/2025-02/34u4akg_sanjay-raut_625x300_12_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
Sanjay Raut on Sharad Pawar : शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिल्यानंतर ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या पुरस्कार सोहळ्यामुळे महाविकास आघाडीत वादंग निर्माण झाला असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जाहीरपणे शरद पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय राऊत काय म्हणाले?
आज संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान केल्याबाबत नाराजी व्यक्त केली. संजय राऊत म्हणाले, पवार साहेब आहेत ते, त्यांच्या गुगलीविषयी अपप्रचार आहे. गेल्या काही काळात महाराष्ट्राचे राजकारण फार विचित्र दिशेने चाललेलं आहे. कोण कोणाला टोप्या घालतंय, कोण कोणाच्या टोप्या उडवतंय आणि कोण कोणाला गुगली टाकतंय आणि कोण स्वत:च हिटविकेट होतंय हे समजून घ्यावं लागले. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं. ही आमची भावना आहे.
नक्की वाचा - Sharad Pawar: एकनाथ शिंदेंचे कौतूक करताना शरद पवारांची गुगली, मात्र दिल्लीतलं वातावरण तापलं
महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार ? ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्ंयाना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे खुलेआमपणे लोकं बसलेले आहेत. त्यांना अशा प्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे. आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो, मात्र बाळासाहेबांची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता, यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील.
एकनाथ शिंदेंच्या त्या विधानाची चर्चा
या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांबद्दल एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हंटलं की, 'हा पुरस्कार महादजी शिंदे यांच्या नावानं आहे. मी एकनाथ शिंदे आहे. इथं ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित आहेत. तसंच भारताचे बॉलर सदानंद शिंदे हे शरद पवारांचे सासरे आहेत. एकप्रकारे इथं सर्वच शिंदेच एकत्र आले आहेत. सदू शिंदे हे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते. त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नसे. पवारसाहेबांची देखील राजकारणाची गुगली देखील अनेकांना कळत नाही. पण, माझे आणि पवार साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आजवर मला कधी गुगली कधी टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत हा विश्वास आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world