माहिम विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत हे विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांचा पराभव केला. त्यानंतर ते कोकणातील आपल्या मुळ गावी आले होते. त्यावेळी त्यांनी सदा सरवणकर यांच्यावर सडकून टीका केली. सरवणकरांचा पराभव करून माहिला लागलेला गद्दारीचा शिक्का पुसल्याची प्रतिक्रीया यावेळी सावंत यांनी दिली. यावेळी त्यांच्या बरोबर शिवसेनेचे नेते राजन तेली उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ते म्हणाले माझ्या मनात एक इर्शा होती. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता. तो माज उतरवला. मागचा हिशोब चुकता झाला. गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकला असे मत माहीम मतदारसंघाचे नवनिर्वाचित उद्धव ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केले.
सदा सरवणकर गेली तीस वर्षे राजकारणात आहेत. पण त्यांनी वेळोवेळी शिवसेने बरोबर गद्दारी केली. बाळासाहेबांनी त्यांना मोठे केले. पण त्याची जाण त्यांनी कधीच ठेवली नाही. ते सतत गद्दारी करत राहीले. अशा गद्दाराला धडा शिकवायचा होता. तो या निवडणुकीत शिकवला. त्यांच्या मुला विरोधातही नगरसेवकपदाच्या निवडणुकीत उभा होता. पण थोडक्या मतांना पराभूत झालो. त्यावेळचा हिशेब आता चुकता केला आहे. याच सरवणकरांनी आपल्यावर गोळीबार केला होता असंही सामंत म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ खडसेंचे फडणवीसांबाबत मोठे वक्तव्य, मोठी घडामोड होणार?
माहिम विधानसभा मतदार संघात सरवणकरांबरोबरच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेही मैदानात होते. पण त्यांचाही निभाव लागला नाही. अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. राज यांनी त्यांच्या मुलाला या मतदार संघातून उमेदवारी दिली. पण आम्ही राज ठाकरेंचे आव्हान मानतच नव्हतो. ते कधीही या निवडणुकीच्या लढतीत नव्हतेच. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाणार हे आम्हाला माहित होते. जसा आम्ही विचार केला त्या प्रमाणेच अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.