शिवसेना नेते आणि आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे. सावंत हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात. त्यात आता विधानसभेच्या तोंडावर त्यांनी केलेल्या वक्तव्याची पडसाद उमटणार हे नक्की आहे. महायुतीत एकमेकां विरोधात टिका करू नका असे वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यानंतरही सावंत यांनी हे वत्तव्य केले आहे. त्यामुळे महायुतीत हे काय सुरू आहे याचीच चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डॉ. तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी दिली आहे. असे असताना त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. धाराशिवमधील पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपले कधीही पटले नाही. त्यांचे आणि आपले कधीही पटू शकत नाही. तिच एक कडवट शिवसैनिक म्हणून आपली भावना आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला सतत आपण विरोध करत आलो आहोत.
ट्रेंडिंग बातमी - वाढवण बंदराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, तर काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत
जरी आम्ही आज कॅबिनेटमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी, कॅबिनेट संपल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर येतो त्यावेळी उलट्या होतात. येवढ्या टोकाचं वक्तव्य सावंत यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीत नक्की चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत एकत्र आल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पराभव झाला असा सुर उमटला होता. शिवाय राष्ट्रवादी महायुतीत नको अशी भूमिका वेळेवेळी कधी शिवसेना तर कधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मांडली आहे.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप महायुती म्हणूनच आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय महायुतीतील पक्षांनी एकमेकांवर बोलणे टाळा. जर कोणाला जास्त खुमखुमी आली असेल तर त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला हे सांगावे. नंतर त्याने त्याला जे बोलायचे आहे ते जाहीर पणे बोलावे असे देवेंद्र फडणवीसांनी महायुतीत्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना बाजावले होते. त्यानंतर सावंत यांनी येवढ्या टोकाचे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भूवाय उंचावल्या आहेत. सावंत यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे वक्तव्य केले आहे का? अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.