विधानसभेच्या अर्थसंकल्पयीय अधिवेशनाला सोमवारपासून (3 मार्च) सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाची सुरुवात वादळी झालीय. बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राजीनामा द्यावा लागला. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी गेल्या काही दिवसांपासून लावून धरली होती. विरोधकांच्या या मागणीला यश आलं असतानाच त्यांना नेता मिळणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. त्याबाबतची एक अपडेट आता समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला होता. शिवसेना उबाठा पक्षाचे 20, काँग्रेसचे 16 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार निवडून आले. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद स्वबळावर मिळण्याचं संख्याबळ कोणत्याही एका पक्षाला नाही. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपद रिक्त राहणार का? अशी चर्चा सुरु झाली होती.
( नक्की वाचा : 'घोटाळ्यांची चौकशी करायला पाच वर्ष कमी पडतील', राज ठाकरेंसमोर राजू पाटील यांचा निशाणा )
त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपद मिळाले तर त्यासाठी उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांचं नावंही चर्चेत होतं. पण, ठाकरे विरोधी पक्षनेते होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीनं त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आलं आहे. आता या नावाला मंजुरी द्यायची की नाही हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यायचा आहे.
कोण आहेत जाधव?
भास्कर जाधव (वय 67) हे शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते सध्या गुहागरचे आमदार आहेत. त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे.
जाधव यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात नगरविकास, वन, बंदरे, विधीमंडळ कामकाज, क्रीडा, युवक कल्याण यासह वेगवेगळी मंत्रिपदं भूषविली आहेत. ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत परतलेले जाधव एकमाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही ठाकरेंसोबतच राहिले. ते या निवडणुकीत कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार आहेत.