Arvind Sawant News: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर'मुळे खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या आठ खासदारांसोबत गुप्त बैठक घेतल्याची आणि हे खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) आठ खासदारांमध्ये अरविंद सावंत यांच्या नावाचाही समावेश असल्याचं म्हटलं जातंय. हे वृत्त समोर आल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या अफवांवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली संतप्त प्रतिक्रिया दिली असून या बातम्यांचा कडाडून निषेध केला आहे.
मी कडाडून निषेध करतो : अरविंद सावंत
खासदार अरविंद सावंत म्हणाले की, "मी थोडा रागात पण आहे आणि कीव पण येते. आज सकाळी मला एकदम मोठा धक्का बसला. मिंदे यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आठ खासदार जाणार, त्यात माझा पण फोटो. कालपर्यत बाकीच्यांचे नावं घेत होते, आज माझंही नाव आहे. या बातमीचा मी कडाडून निषेध करतो. केवळ महाराष्ट्रातील नाही देशातील जनतेने हे लक्षात घ्यायला पाहिजे की खोट्या बातम्या कशा दिल्या जातात."
"मी जर बोललो असेन तर..." : अरविंद सावंत
अरविंद सावंत पुढे म्हणाले की, "मला अनिल देसाईंनी ती बातमी पाठवली, मला आश्चर्य वाटलं. कुठेतरी बैठक झाली, त्या बैठकीला सहा जण हजर होते, दोन जण व्हिडीओ कॉलद्वारे बोलले. माझे सर्व मोबाइल तुम्हाला देतो, त्यात एका जरी ठिकाणी यांचा कोणाचा कॉल आला असेल तर किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती मी स्वीकारेन. मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक, उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. मला उभं चिरलं तरी मातोश्रीशी प्रतारणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. आईने जन्म दिला, मूर्ती (मला) बाळासाहेब ठाकरेंनी घडवलीय. मोठ्या साहेबांनी आमदार केले, उद्धव ठाकरेंनी खासदार केले, त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा आहे. असले घाणेरडे विचार बाळासाहेबांचे नाहीत".
(नक्की वाचा: Political News: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? एकनाथ शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर'; ठाकरेंच्या 8 खासदारांची गुप्त बैठक?)
आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार : अरविंद सावंत
"मी ऑफलाइन ऑनलाइन कोणत्याही प्रकारच्या बैठकीला गेलो नाही आणि मला कोणाचा फोनही आला नाही. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार आहे. आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहे आणि मरेपर्यंतही राहणार आहे. भगवा घेऊन आलो आणि भगवा पांघरुण जाणार आहे", असेही खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.
बैठकीचा फोटो छापा : अरविंद सावंत
"प्रत्येक खासदार आपापल्या कामात आहेत, कोण गेले मग? जे लोक बैठकीला उपस्थित होते हिंमत असेल त्यांचा फोटो छापा. आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं या विषयावर सुनावणी आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या, मग कोर्टात दाखवायचं की इथे काही क्षिल्लक नाही, आम्हीच आहोत सर्व. जगू ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेसोबतच", असेही अरविंद सावंत यांनी ठामपणे सांगितलंय.
खासदार अरविंद सावंत यांची संपूर्ण पत्रकार परिषद