गुरूप्रसाद दळवी
भाजपच काय पण शिवसेनेतेही कुणाचा प्रवेश होणार हे आपल्याला विचारल्या शिवाय होणार नाही असं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केलं होतं. या विधानाची हवाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काढून घेतल्याचं चित्र निर्माण झालं आहे. सिंधुदुर्गातील राणेंचा एकेकाळचा कट्टर समर्थन आणि नंतरचा विरोधक असलेल्या नेत्याला भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. विशेष म्हणजे राणेंना न विचारता हा पक्ष प्रवेश झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राणेंच्या सिंधुदुर्गातील वर्चस्वाला चाप लावण्यासाठी भाजपनेच हा गेम गेल्याची सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तूळात चर्चा रंगली आहे. भाजपनेच राणेंचे करेक्ट कार्यक्रम केल्याचंही बोललं जात आहे.
विशाल परब असं या युवा नेत्याचं नाव आहे. ते भाजपचे राज्य युवा उपाध्यक्ष होते. सावंतवाडीमध्ये त्यांची मोठी ताकद आहे. आधी ते निलेश राणे यांचे कट्टर समर्थक होते. राणे कुटुंबीयांच्या जवळचे होते. मात्र ज्यावेळी रविंद्र चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले त्यावेळी परब यांची चव्हाण यांच्या बरोबर जवळीक वाढली. त्यांचा थेट राज्याच्या नेत्यांशी संपर्कही वाढला. त्यातूनच त्यांच्यावर प्रदेश युवा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्याच वेळी राणे आणि परब यांच्या संबंधात ठिणगी पडली. पुढे विधानसभा निवडणुकी वेळी विशाल परब यांना भाजपची उमेदवारी हवी होती. पण त्यांना ती मिळाली नाही.
त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांनी विशाल परब यांना फोन केला होता. त्यावेळी राणेंनी आपल्याला आणि रविंद्र चव्हाण यांना कसा त्रास दिला आहे याचा पाढा वाचला होता. तो फोन व्हायरल ही झाला होता. मात्र त्यानंतरही परब यांनी उमेदवारी मागे घेतली नव्हती. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. त्यांचा निवडणुकीत पराभव झाल. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. पण त्यांना मिळालेली मते ही खूप जास्त होती. त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती.
Jalgaon News: एकाच कुटुंबातील 5 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, जळगावातील हृदयद्रावक घटना
विधानसभा निवडणुकी वेळी राणेंनी याच परब यांच्यावर जहरी टिका केली होती. दोघांमध्ये वितूष्ट निर्माण झाले होते. त्यानंतर पाण्या खालून बरेच पाणी गेले. रविंद्र चव्हाण यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी विशाल परब यांना थेट पक्षात प्रवेश दिला आहे. हा पक्ष प्रवेश मुंबईत प्रदेश कार्यालयात झाला. त्यावेळी राणे कुटुंबातील कोणी ही उपस्थित नव्हते. परब यांना एक प्रकारे भाजपने ताकद देण्याचे ठरवले आहे. परब यांचा प्रवेश ही राणे यांना न विचारता झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे परब यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राणेंच्या वर्चस्वाला चाप लावण्याचा प्लॅनच भाजपनं तयार केला नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी राणेंची फिरकी घेतली आहे. आता तुम्ही विशाल परब यांच्या मांडीला मांडी लावून बसणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे.