Supriya Sule Daughter Marriage News: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जाणारा अक्षय्य तृतीया सण राज्यभरात उत्साहात साजरा केला गेला. याच शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर आणि महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपल्या कन्या रेवती आणि सारंग यांच्या लग्नाची पत्रिका देवादिकांच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद घेतले.
श्री सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी देवीचे घेतले दर्शन
रविवारी (19 एप्रिल) सकाळी सुप्रिया सुळे यांनी सर्वप्रथम सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी महालक्ष्मी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने महालक्ष्मी मंदिरामध्ये आंब्यांची आरास केली होती.
लेकीच्या नवीन आयुष्यासाठी सुप्रिया सुळेंनी घेतले आशीर्वाद
सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांचा विवाह सारंग यांच्यासोबत लवकरच पार पडणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी आपल्या मुलीच्या पुढील आयुष्यासाठी आणि सुखद प्रवासासाठी त्यांनी बाप्पा तसेच महालक्ष्मीच्या चरणी लग्नपत्रिका ठेवून प्रार्थना केली. राजकारणातील व्यस्त धावपळीतून वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत विधी पूर्ण करताना सुप्रिया सुळे दिसल्या. दरम्यान रेवती आणि सारंग यांचे लग्न कधी होणार आहे? याची तारीख समोर आलेली नाही.
सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे (Revati Sule) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी (Arun Lakhani) यांचे सुपुत्र सारंग लखानी (Sarang Lakhani News) यांच्याशी रेवती सुळे लग्नगाठ बांधणार आहेत. या विवाहाची चर्चा राज्यभर रंगली आहे.
(नक्की वाचा: Supriya Sule Daughter Marriage: पवार कुटुंबात सनईचौघडे! सुप्रिया सुळेंची लेक अडकणार विवाहबंधनात, हा होणार जावई)
कोण आहेत सारंग लखानी? | Who Is Sarang Lakhani In Marathiसारंग लखानी हे नागपूर शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील सदस्य आहेत. विश्वराज ग्रुपचे (Vishvaraj Group) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग (Sarang Lakhani) यांची ओळख केवळ एक व्यावसायिक म्हणूनच नव्हे तर ते एक उत्तम बॅडमिंटनपटू सुद्धा आहेत. त्यांनी आजवर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलाय.