स्वानंद पाटील, प्रतिनिधी
बीड लोकसभा मतदारसंघातील (Beed Lok Sabha) चुरशीच्या लढतीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला. या पराभवानंतर बीड जिल्ह्यात अद्यापही तणावाचं वातावरण आहे. पंकजा यांच्या पराभवानंतर वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यामध्ये काही भावनिक आणि आक्षेपार्ह पोस्टचाही समावेश होता. या आक्षेपार्ह पोस्टनंतर बीड जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या पोस्टच्या निषेधार्थ जिल्ह्यातल्या 4 गावांमध्ये आत्तापर्यंत बंद पुकारण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या गावात बंद?
बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार ,परळी वैजनाथ, वडवणी,शिरसाळा या चार गावात बंद पुकारण्यात आला.तर बीड,धारूर,केज या तीन गावात प्रशासनाला निवेदन देत पंकजा मुंडे यांच्यावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
शिरसाळ्यात सकल ओबीसी समाजाच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे् चौकी ते पोलीस स्टेशन असा मोर्चा काढण्यात आला. परळी विधानसभा मतदार संघातील ओबीसी समाजानं या मोर्चाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केलं.
( नक्की वाचा : पंकजा मुंडेंच्या पराभवाचा धक्का, लातूरच्या कार्यकर्त्यानं घेतला टोकाचा निर्णय )
धनंजय मुंडे यांनीही केलं होतं आवाहान
दरम्यान पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शांततेचं आवाहन केलं होतं. 'सोशल मीडियावर अजूनही आमच्यासारख्या नेत्यांचे फोटो आणि बनावट व्हिडीओ पोस्ट करून वातावरण दूषित केले जात आहे. अत्यंत खालच्या भाषेत राजकीय नेत्यांवर टीका करणाऱ्या पोस्ट तसेच जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, की हे आता थांबलं पाहिजे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं.
"क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै", स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेप्रमाणे मी व पंकजांनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे. लोकशाहीत जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो कौल आपण मान्य करून विजयी उमेदवारास शुभेच्छा देखील दिल्या आहेत, असं धनंजय यांनी सांगितलं होतं.