'मुलगी आणि जावायाला नदीत फेकून द्या', राष्ट्रवादीच्या मंत्र्याचं मतदारांना आवाहन

धर्मरावबाबा अत्राम (Dharmaraobaba Atram) यांनी त्यांची मुलगी तसंच जावायाला नदीत फेकून द्या, असं आवाहन केल्यानं खळबळ उडाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
D
मुंबई:

विधानभा निवडणुका जवळ येऊ लागताच सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विद्यमान आमदार तसंच मंत्रीही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येक मतदारसंघात उमेदवारीचे अनेक दावेदार आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणं हे राजकारणात नवं नाही. पण, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा अत्राम (Dharmaraobaba Atram ) यांनी त्यांची मुलगी तसंच जावायाला नदीत फेकून द्या, असं आवाहन केल्यानं खळबळ उडाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी या मतदारसंघातील सभेत अत्राम बोलत होते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अत्राम यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच हे वादग्रस्त वक्तव्य केलं. अजित पवार त्यांच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अहेरीमध्ये आले होते. अत्राम यांची मुलगी भाग्यश्री आणि जावई ऋतुराज हलगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या विश्वासघाताबद्दल त्यांना प्राणहिता नदीमध्ये फेकून द्या, असं वक्तव्य अत्राम यांनी केलं. 

'लोक पक्ष सोडून जातात पण त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आमच्या कुटुंबातील काही लोकांना माझ्या राजकीय ताकदीचा वापर करून दुसऱ्या पक्षात प्रवेश घ्यायचा आहे. 40 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात लोकांनी पक्षांतर केले आहे. आता शरद पवार गटाच्या नेत्यांना माझ्या घरात फुट पाडून माझ्या मुलीला माझ्या विरोधात उभे करायचे आहे. माझ्या जावई आणि मुलीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन अत्राम यांनी या सभेत मतदारांना केलं. 

( नक्की वाचा : नितीन गडकरींच्या वाहनाचे स्टेअरिंग भाजपाच्या जुन्या नेत्याच्या हाती, विदर्भात चर्चांना उधाण )
 

'या लोकांनी मला सोडून दिलं आहे. तुम्ही त्यांना प्राणहिता नदीमध्ये फेकून द्या. ते माझ्या मुलीची बाजू घेऊन तिला वडिलांच्या विरोधात उभं करत आहेत. जी मुलगी वडिलांची झाली नाही ती तुमची कशी झाली? तुम्ही याचा विचार करा. ती तुम्हाला कशी न्याय देईल? तिच्यावर विश्वास ठेवू नका. मी राजकारणात या लोकांकडं मुलगी, भाऊ किंवा बहीण म्हणून पाहणार नाही,' असं अत्राम यांनी जाहीर केलं.

एक मुलगी मला सोडून गेली असली तरी दुसरी मुलगी, मुलगा, भाऊ आणि चुलत भावाचा मुलगा माझ्यासोबतच आहे, असं अत्राम यांनी यावेळी स्पष्ट केलं.  

वस्ताद कधीही सर्व डाव शिकवत नाही

अजित पवार यांनी यावेळी भाषणात बोलताना धर्मरावबाबा अत्राम यांची बाजू घेतली. संपूर्ण कुटुंब धर्मरावबाबा अत्राम यांच्यासोबत आहे. त्यापैकी एकाला त्यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. पण आता ते (भाग्यश्री) धर्मरावबाबांच्या विरोधात लढण्यासाठी तयारी करत आहेत. या भागात कुस्ती खूप प्रसिद्ध आहे. वस्ताद त्याच्या शिष्याला कधीही सर्व डाव शिकवत नाही. एक डाव स्वत:कडं राखून ठेवतो. मी त्यांना (भाग्यश्री) आवाहन करतो की चूक करु नका. तुमच्या वडिलांसोबतच राहा, असं पवार यांनी यावेळी सांगितलं. 
 

Advertisement