लोकसभेचं अधिवेशन सुरु होताच सभागृहाचा अध्यक्ष कोण होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (NDA) ओम बिर्ला यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलीय. त्यांना काँग्रेसच्या के. सुरेश यांनी आव्हान दिलंय. लोकसभा अध्यक्षपदाची निवड एकमतानं व्हावी हा सरकारचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची डेडलाईन संपण्याच्या 10 मिनिटं आधी काँग्रेसच्ये के. सुरेश यांनी उमेदवारी दाखल केली. काँग्रेसच्या या निर्णयाचे पडसाद इंडिया आघाडीत उमटले आहेत. या आघाडीतील मोठा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसनं यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून सुरेश यांनी अर्ज दाखल केल्यानं तृणमूल काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून हा काँग्रेसचा एकतर्फी मत असल्याचं पक्षाचं मत आहे. एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांनी या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी तृणमूल काँग्रेसची यापूर्वीच संपर्क साधला होता, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. राहुल गांधी यांनी देखील तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेऊन पक्षाच्या भूमिकेत शेवटच्या क्षणी झालेल्या बदलाची माहिती दिली.
तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांनी याबाबत पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती दिली. 'मला टीव्हीवर पाहिल्यानंतरच याबाबत समजलं,' असं त्यांनी सांगितलं. तृणमूलचे आणखी एक नेते डेरेक ओ ब्रायन यांनी NDTV ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : राहुल गांधींनी वायनाड सोडताच काँग्रेसचा मित्रपक्ष संतापला )
काँग्रेसनं या प्रकरणात त्यांची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यांना याचं कारण माहिती असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. तृणमूल काँग्रेस सुरेश यांना पाठिंबा देणार का? या प्रश्नावर 'आम्ही या विषयावर बैठकीत चर्चा करु. त्याचबरोबर आमचे नेते याबाबतचा निर्णय घेईल,' असं ओब्रायन यांनी स्पष्ट केलं.
के. सुरेश यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होईल, असा विरोधकांचा अंदाज होता. पण, भाजपानं ओडिशामधील त्यांचे वरिष्ठ नेते भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्षपदी निवड केली. त्यानंतर विरोधकांनी अध्यक्षपदासाठी सुरेश यांना उमेदवारी दिली. लोकसभा उपाध्यक्षपद देण्याची विरोधकांच्या मागणीला सरकारनं प्रतिसाद दिला नाही. सामान्य प्रथेनुसार लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिलं जातं.
राहुल गांधी यांचा आरोप
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान झाल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदी यांना विरोधकांचं कोणतंही विधायक सहकार्य नको आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडं लोकसभा अध्यक्षपदासाठी सर्व पक्षांमध्ये सहमती बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन केला नाही. हा खर्गे यांचा अपमान आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यायला हवं, अशी मागणी देखील त्यांनी संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना केली.