काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रायबरेलीचे खासदार राहणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल उत्तर प्रदेशातील रायबरेलीसह केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही विजयी झाले होते. विशेष म्हणजे राहुल वायनाडमधून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले होते. तर रायबरेलीतून त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकली होती. संसदेच्या नियमानुसार राहुल गांधी यांना दोन्हीपैकी एक मतदारसंघ सोडणे आवश्यक होता. त्यामुळे त्यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला. आता राहुलच्या जागी त्यांच्या बहीण प्रियांका गांधी वायनाडची पोटनिवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी यांनी त्यांचा निर्णय जाहीर करताच त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झालीय. विरोधी पक्ष भाजपासह काँग्रेसच्या मित्रपक्षानंही राहुल गांधींच्या निर्णयावर टीका केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मतदारांवर अन्याय
राहुल गांधी यांचा हा निर्णय वायनाडच्या मतदारांवर अन्याय आहे. एक नेता दोन जागांवर निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे त्यांनी हा निर्णय एका दिवसात विचार करुन घेतलेला नसेल. त्याबाबत त्यांनी यापूर्वीच विचार केला असणार. राहुल गांधी यांनी वायनाडच्या मतदारांना त्यांच्या निर्णयाची कल्पना द्यायला हवी होती, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या एनी राजा यांनी केलीय.
काँग्रेसच्या सर्वात खराब कालखंडामध्ये वायनाडच्या मतदारांनी राहुल गांधी यांना विजयी केलं होतं. त्यांनी हा निर्णय मतदारांना सांगयला पाहिजे होता. आता निवडणुकीनंतर अचानक ते याबाबत घोषणा करतात. हा मतदारांवर अन्याय आहे. हे मी यापूर्वीही सांगत होते, आताही सांगत आहे, असं राजा यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : राहुल गांधींनी एक चूक केली नसती तर आज देशाचं चित्र वेगळं असतं )
काँग्रेस कौटुंबिक पक्ष
राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी काँग्रेसच्या उमेदवार असतील. वायनाडसाठी प्रियांका यांचं नाव जाहीर होतात भाजपानं त्यावर टीका केलीय. काँग्रेसची प्रत्येक कृती ही तो कुटुंबानी कुटंबासाठी आणि कुटुंबाकडून चालवण्यात येणारा पक्ष असल्याचं सिद्ध होत आहे. राहुल यांनी ते दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत हे शेवटपर्यंत वायनाडच्या मतदारांपर्यंत लपवून ठेवलं, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल अँटोनी यांनी केली.
काँग्रेसचा हिंदूंवर विश्वास नाही
काँग्रेस सोडून नुकतेच भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रमोद कृष्णन यांनी देखील या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेसचा हिंदूंवर विश्वास नाही, हे त्यांनी प्रियांका यांना उमेदवारी देऊन सिद्ध केलंय, अशी टीका कृष्णन यांनी केली. पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी यांना उमेदवारी देऊन त्यांची प्रतिमा लहान करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतोय, असा दावा कृष्णन यांनी केला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world