उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने महायुती सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजना सरकारने मतांसाठी निवडणुकी आधी जाहीर केली होती. निवडणूक आयोगाच्या मदतीने त्यांनी निवडणुकी दरम्यान त्यावर स्थगिती आणली. आता आचारसंहिता संपली आहे. नवं सरकार ही आलं आहे. त्यामुळे मागिल सर्व महिन्यांच्या बॅकलॉगसह बहिणींच्या खात्यात पैसे तातडीने जमा करावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आता या योजनेत आवडती बहीण नावडती बहीण असा भेद करू नये असं ठाकरे यावेळी म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. आधी अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार जनतेने पाहीले. आताचे सरकार हे ईव्हीएम सरकार आहे. अशा या सरकारला आमच्या शुभेच्छा आहे. नाईलाजाने आता या सरकारकडे जनतेच्या आपेक्षा आहेत. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. निवडणुकी आधी पाच महिन्यांचे पैसे बहीणींच्या खात्यात जमा केले आहेत. महायुतीने निवडणुकीनंतर 2100 रूपये देणार असे आश्वासन दिले होते. हे पैसे तातडीने बहीणींच्या खात्यात जमा करावेत. त्यांच्या आता कोणतेही निकष लावू नयेत. जसे सरसकट सर्वांना आधी पैसे देण्यात आले तसेच आताही देण्यात यावेत. आवडती आणि नावडती बहीण असा भेदभाव करू नये असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर ही जोरदार टीका केली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण चर्चा ही कोणाला वगळलं याचीच होती. मंत्रिपद मिळाले त्यांच्या फटाक्यां पेक्षा नाराजांचे बार मोठ्या आवाजात फुटत होते असं ठाकरे यावेळी म्हणाले. शिवाय मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांचा परिचय करून दिला. ही पहिली वेळ असेल ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्यांचीच आपले मंत्री म्हणून त्यांनी ओळख करून दिली. ज्यांच्यावर ईडी इनकमटॅक्सच्या धाडी पडल्या. त्यांनाच मंत्रिमंडळात घेतले. हे असलं कोणतं सरकार आहे असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महायुतीला राक्षसी बहुमत मिळाले. पण तरीही सरकार स्थापनेला वेळ लागलाय. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारालाही बराच वेळ गेला. त्यात आता खाते वाटपालाही विलंब होत आहे. बिन खात्याचे मंत्री सभागृहात बसत आहेत. हे अधिवेशन म्हणजे गंमत आहे का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. विधानसभेत आमचे वीस आमदार आहेत. पण ते फडणवीसांना काफी आहेत. आम्ही प्रत्येक गोष्टीचा जाब त्यांना निश्चित विचारू असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय जनतेच्या सभागृहात ही काही प्रश्न घेवून जावू असं त्यांनी सांगितलं.