रामराजे शिंदे, प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते हिंदू पदपातशाह होते, असे दावा हिंदुत्वावादी संघटनेकडून केला जातो. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दाव्याला छेद देणारी भूमिका मांडली आहे. शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर होते, असं गडकरींनी स्पष्ट केलं. कादंबरीकार विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या 2 इंग्रजी पुस्तकांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये प्रकाशन झालं. या कार्यक्रमात ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र इंग्रजीत येतंय ही आनंदाची बातमी आहे. आमच्या मनात आई-वडिलांपेक्षा शिवाजी महाराजांचं स्थान मोठं आहे, असं गडकरींनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर भेट झाली तेंव्हा शिवाजी महाराज यांच्यावर अफजल खानने वार केला तेंव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला. त्यानंतर अफजलखानची कबर सन्मानाने झाली पाहिजे, असा आदेश महाराजांनी दिला, असं गडकरी यावेळी म्हणाले.
( नक्की वाचा : Waqf Bill : विरोधकांच्या सर्वात मोठ्या आक्षेपाची हवा गृहमंत्र्यांनी काढली, वक्फ विधेयकावर मोठा खुलासा )
छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते. सेक्युलर शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत अर्थ सर्व धर्म समभाव असा आहे. सर्व धर्माच्या सोबत समान न्याय करणे हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक देखील होते, असं गडकरींनी सांगितलं.
शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने माघारी पाठवलं. त्यांनी वेळप्रसंगी मुलाला शिक्षा करायला मागे पुढे पाहिलं नाही.. नाहीतर राजकारणात आजकाल सगळे आपली मुलं, मुली आणि पत्नी यांना तिकीट मागतात, याची आठवणही गडकरींनी करुन दिली.
जात पात धर्म पंथ याने व्यक्ती मोठा होत नाही तर पराक्रमाने मोठा होतो. शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक देखील होते. शिवाजी महाराज यांचं कार्य फक्त महाराष्ट्र पुरत मर्यादित न राहता जगभर जायला हवं, अशी अपेक्षाही गडकरी यांनी यावेळी बोलून दाखवली.