विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहीम आणि त्यानंतर त्या भागात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज (शुक्रवार 19 जुलै) इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान आंदोलनास्थळी इम्तियाज जली यांच्याकडून भाषण करण्यात आलं. त्यानंतर विभागीय आयुक्त यांना विशालगड प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारा निवेदन देण्यात आलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'आज आम्ही बोललो नाही तर ते उद्या दुसऱ्या ठिकाणी टार्गेट करतील. त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं शांततामय आंदोलन करण्यासाठी आलो आहोत. या देशामध्ये फक्त मुस्लिमांनी याचा विरोध करायचा असं नाही. या देशात राहणारे अनेक नॉन मुस्लिम आणि सेक्युलर मंडळींनी रस्त्यावर येऊन हे सर्व थांबवलं पाहिजे. हा हल्ला होत होता त्यावेळी हे सर्व लोकं घरामध्ये लपून-छपून बसले होते. तीन दिवसानंतर तुम्ही बाहेर येता आणि मला शांतता राखा असं सांगता. तुम्ही त्याच दिवशी बाहेर पडला असता तर हे प्रकरण झालंच नसतं. पोलिसांनी जबाबदारी पार पाडली असती तर हे प्रकरण झालंच नसतं. माझ्यावर बोट दाखवताना लाज वाटत नाही का?' अशी टिका जलील यांनी केली.
तुम्ही जाळपोळ करता आणि मला गप्प बसायला सांगता. काहीही करु नका, असं सांगता. आज एका ठिकाणी हल्ला झालाय. उद्या आमच्या शेजारी ते गुंड लोकं टार्गेट करतील, असं जलील यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये या आंदोलनाच्या निमित्तानं कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
( नक्की वाचा : विशाळगडावरील अतिक्रमण : राजे विरुद्ध महाराज? राजघराण्यातील वादाची राज्यात चर्चा )
तरुणांची जोरदार घोषणाबाजी
छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त कार्यालय समोर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनास्थळी तरुणांची मोठी गर्दी होती. त्यामुळे या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांची मोठी गर्दी पाहता विभागीय आयुक्त कार्यालय समोरील दोन्ही मार्ग बंद करण्यात आले होते.