संजय तिवारी, प्रतिनिधी
Waqf Amendment Bill : संसदेच्या दोन्ही सभागृहानं मान्यता दिल्यानंतर वक्फ संशोधन विधेयक लागू झालं आहे. या विधेयकावरील आक्षेपांना केंद्र सरकारकडून संसदेतील चर्चेत उत्तर देण्यात आले होते. त्यानंतरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. देशातील अनेक भागात या संशोधन विधेयकाच्या विरोधात आंदोलन झालं. पश्चिम बंगालमध्ये हे आंदोलन हिंसक बनले होते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर या विधेयकाची अंमलबजावणी राज्यात केली जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. या विधेयकाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मैदानात उतरला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंचाकडून या विधेयकाबाबत जनजागृती अभियान राबवले जाणार आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे अखिल भारतीय संयोजक विराग पाचपोर यांनी 'NDTV मराठी' बरोबर बोलताना ही माहिती दिली.
काय आहे अभियान?
या कायद्यामुळे मुस्लिम समाजाचे कुठलेही नुकसान होणार नसून त्यांच्या मशिदी, त्यांच्या इमारती, त्यांचे कब्रस्तान कुणी हिरावून घेणार नाही, हे स्पष्टपणे समाजात सर्वांना कळले पाहिजे. काही कट्टरपंथी लोक मुस्लिम समाजात गैरसमजुती पसरवून भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या अभियानाद्वारे वक्फ सुधारणा कायदा सामान्य मुस्लिमांच्या कशा हिताचा आहे हे तथ्यांच्या आधारे समजावून सांगितले जाईल.
( नक्की वाचा : Waqf Bill : विरोधकांच्या सर्वात मोठ्या आक्षेपाची हवा गृहमंत्र्यांनी काढली, वक्फ विधेयकावर मोठा खुलासा )
देशात मोठ्या प्रमाणात वक्फ संपत्ती असून देखील त्याचा वापर आजवर कसा पद्धतीने करण्यात आला आणि त्यातून मुस्लिम समाजातील सामान्य सदस्यांना काही लाभ कसा मिळाला नाही, हे प्रश्न आता विचारले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे अभियान महत्त्वाचे ठरणार असल्याचे पाचपोर यांनी स्पष्ट केले.
देशभरातील प्रत्येक शहरात आणि जिथे जिथे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे तिथे सर्व ठिकाणी सभा आणि बैठका घेण्यात येणार आहेत. या विधेयकाला जिथं हिंसक विरोध झाला त्या पश्चिम बंगालमध्येदेखील देशाच्या अन्य भागाप्रमाणेच हे अभियान राबविण्यात येणार आहे.