फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे हे गेल्या काही काळापासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लीम नव्हता असं ही त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. काहींनी तर राणेंना इतिहास शिकण्याची गरज आहे असा सल्लाही दिला होता. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार उदयराजे भोसले यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय महाराजांच्या सैन्यात कोण होते? महाराजांचे सहकारी कोण होते? याबाबत त्यांनी सत्य काय आहे तेच सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. त्यांचे सहकारी ही वेगवेगळ्या जाती धर्माचे होते. त्यात मुस्लीम ही होते. हिंदू ही होते. फक्त मराठा समाज महाराजां बरोबर होता असं नाही. इतर जाती धर्माचे ही लोक त्यांच्या बरोबर होते. मुस्लीम हे महाराजांच्या सैन्यात जबाबदारीच्या पदावर कार्यरत होते, असं ही उदयन राजे भोसले यांनी सांगितलं. शिवाय नितेश राणे यांनी केलेलं वक्तव्यही त्यांनी खोडून काढलं.
नितेश राणे हे भावनेच्या आहारी जावून बोलले असतील अशी सारवासारव ही उदयन राजे भोसले यांनी यावेळी केली. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजेंचे हाल करून त्यांची हत्या करण्यात आली, त्या रागापोटी ते बोलले असतील असं ही त्यांनी सांगितलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. त्यात मुस्लीमही होते हे सत्य आहे. ते नाकारता येणार नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
समाजा समाजात तेढ निर्माण करण्याची सुरूवात ही काँग्रेसने केली असा आरोपही यावेळी भोसले यांनी केला. काँग्रेसनेच मुस्लीमांना या देशात एक व्यासपीठ मिळवून दिलं. त्यांना उचलून धरलं. त्यातूनच द्वेष भावना निर्माण झाली असा तर्कही उदयन राजे भोसले यांनी लावला. आपण हे वक्तव्य भाजप म्हणून नाही तर या देशाचा एक नागरिक म्हणून करत आहोत. छत्रपती घराण्याचा एक घटक म्हणून आपण बोलत आहोत. असं ही ते म्हणाले. मी जनतेचा सेवक आहे त्यामुळे यावर बोलले पाहीजे असंही ते म्हणाले.