योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Mayor Election News Update : अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीच्या नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण तापलं आहे.भाजपकडून महापौरपदासाठी मोठ्या हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाने प्रदेश कार्यालयाकडे पाच नावांची शिफारस केली आहे. यामध्ये सोनाली अंधारे, रश्मी अवचार, निकिता देशमुख, शारदा खेळकर आणि नीतू जगताप यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. यंदा महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या पाच नावांपैकीच एक नाव अंतिम करून भाजप आपला महापौर उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात स्पर्धा वाढली असून, इच्छुकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नामनिर्देशनासाठी गर्दी, सर्व पक्ष मैदानात
अकोल्याच्या महानगरपालिकेत आज भाजप, ठाकरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांकडून मोठ्या संख्येने नामनिर्देशन अर्ज घेण्यात आले आहेत. महापौर पदासाठी तब्बल २० जणांनी तर उपमहापौर पदासाठी २६ जणांनी नामनिर्देशन अर्ज घेतले आहेत. महापौर पदासाठी कल्पना गोठफोडे, योगिता पावसाळे, शारदा खेळकर, वैशाली शेळके, सूरेखा मंगेश काळे आणि निखित शाहीन अकसर कुरेशी यांचा समावेश आहे. तर उपमहापौर पदासाठी धनंजय धबाले, अमोल मोहकार, अमोल घोंगे, विजय इंगळे, नितीन ताकवले, पराग गवई आणि सागर भारुका यांनी अर्ज घेतले आहेत. विविध पक्षांच्या सहभागामुळे निवडणुकीचा थरार अधिक वाढला आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात खळबळ! विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु होतं सेक्स रॅकेट, पोलीस येताच 'त्या' 5 तरुणी..
सत्तास्थापनेचा दावा, मात्र संख्याबळावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, भाजपने महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ४४ नगरसेवकांची आघाडी तयार केल्याचा दावा केला आहे. या “शहर सुधार आघाडी”मध्ये भाजपचे ३८ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) १, १ अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ३ नगरसेवक सहभागी असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील पत्र अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहे. मात्र शरद पवार गटातील तीन नगरसेवकांची भूमिका सध्या फिफ्टी-फिफ्टी असल्याने राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असून, शरद पवार गटाने माघार घेतल्यास भाजप ४१ च्या जादुई आकड्यावर पोहोचते का, याकडे अकोल्याचे लक्ष लागले आहे.