धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्री असताना त्यांना सातपुडा हा बंगला दिला गेला होता. पण मंत्रिपद गेल्यानंतरही त्यांना हा बंगला अजूनही सोडलेला नाही. मात्र मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे त्यांचा सरकारी बंगला सातपुडा सोडायला का तयार नाहीत? एकीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झालेले भुजबळ सातपुड्यावर राहायला जाण्यासाठी वेटिंगवर आहेत. पण दुसरीकडे धनंजय मुंडेंना काही केल्या सातपुडा बंगला सोडवत नाही. तर दुसरीकडे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आपल्या घरी राहायला येण्याची साद घातली आहे. पण त्यांना भुजबळांसाठी बंगला सोडवतही नाही आणि करुणा मुंडेंकडे राहायला जाता येत नाही, असं धनंजय मुंडेंचं झालं आहे. त्यात आता धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण देत खरं कारण सांगितलं आहे.
धनंजय मुंडेंनी ही अवस्था स्वतःहूनच करुन घेतली आहे. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाऊन आता पाच महिने उलटले आहेत. तर भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आता तीन महिने झाले आहेत. पण धनंजय मुंडे त्यांचा बंगला रिकामा करायला तयार नाहीत. पण मुंडेंचा हा हट्ट कशासाठी असा प्रश्न पडला आहे. कारण धनंजय मुंडेंचा स्वतःचा गिरगाव चौपाटीवर आलिशान फ्लॅट आहे. धनंजय मुंडेंचा पत्ता फ्लॅट नंबर 902, 9 वा मजला. वीरभवन बिल्डिंग मध्ये हा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तब्बल 2 हजार 151 फुटांचा आहे. त्याची किंमत तब्बल 16 कोटी आहे.
नक्की वाचा - Dadar kabutar Khana: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदी कायम, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्येही या फ्लॅटचा उल्लेख आहे. सध्या या फ्लॅटमध्ये कुणीही राहात नाही. तरीही धनंजय मुंडे या फ्लॅटमध्ये राहायला जायला तयार नाहीत. विशेष म्हणजे आपलं मुंबईत घर नसल्यानं आपण सरकारी बंगला सोडत नसल्याचं धनंजय मुंडेंनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आता मात्र धनंजय मुंडेंचे मुंबईमध्ये गिरगाव आणि पवईमध्ये फ्लॅट आहेत, असा दावा करुणा मुंडेंनी केला आहे. एवढंच नव्हे तर धनंजय मुंडेंनी आपल्या घरी राहायला यावं, असा आग्रह करुणा मुंडेंनी केला आहे.
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर साधारण पंधरा दिवसांत मंत्र्यांना बंगला रिकामा करावा लागतो. त्यानंतरही बंगला रिकामा केला नाही तर मंत्र्याकडून दंड आकारला जातो. धनंजय मुंडेंनी बंगला सोडला नसल्यानं आतापर्यंत त्यांना ४२ लाखांचा दंड झाला आहे. मात्र हा दंड वसूल करायचा की माफ करायचा याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. गिरगावच्या फ्लॅटमध्ये राहायला का जात नाही, यावर आता धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबईतलं माझं घर सध्या राहण्यायोग्य नाही. त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात आहे. माझ्या विविध आजारांवरच्या उपचारार्थ मला मुंबईत राहणे गरजेचे आहे. मात्र या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे. मी घर शोधतोय असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.
मुंडेंनी हे स्पष्टीकरण दिलं असलं तरी पाच महिन्यांत धनंजय मुंडेंनी फ्लॅटची दुरुस्ती का करुन घेतली नाही, हा प्रश्न आहेच. करुणा मुंडेंनी कितीही आग्रह केला तरी धनंजय मुंडे पुन्हा करुणा मुंडेंकडे राहायला जातील, अशी शक्यता आता तरी वाटत नाही. मुंडेंना अशी कुठली आशा लागून राहिलीय की त्यांचा जीव सातपुडा बंगल्यात एवढा का अडकलाय हा ही प्रश्न आहेत. त्या मागचे कारण मात्र कळत नाही.