विधानसभा निवडणुकीची तयारी महाविकास आघाडीने सुरू केली आहे. जागावाटपांची प्राथमिक बैठकही झाली आहे. काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रीत निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. जागावाटप लवकर जाहीर केले जाईल असे तिन्ही पक्षांनी सांगितले आहे. त्यात आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी जागा वाटपापासून ते अगदी मुख्यमंत्रीपदा पर्यंत सर्वच गोष्टींवर रोखठोक भूमिका मांडली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीला आता फक्त 70 ते 80 दिवस शिल्लक आहेत. राज्यात एकूण 288 जागा आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरवताना वेळ लागणार आहे. अशा वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र बसले पाहीजे. शिवाय तातडीने जागावाटप जाहीर केले पाहीजे असे विश्वजित कदम यांनी सांगितले. चर्चा होवून लवकर जागा वाटप होणे हे गरजेचे आहे. वेळ घालवून चालणार नाही. वेळेत जागा वाटप झाले तर उमेदवारांनाही वेळ मिळेल. प्रचारालाही लवकर लागता येईल अशी भूमिका त्यांनी मांडली.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा अशी चर्चा सध्या सुरू आहे. याबाबतही कदम यांना विचारण्यात आले. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असावा का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना कदम म्हणाले की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा हे मविआच्या नेत्यांनी एकत्र बसून ठरवावे. त्यावर आपण बोलणे योग्य ठरणार नाही असेही ते म्हणाले.
( नक्की वाचा : कारगिल @ 25 : सोनूला सांगा PCM चे कोचिंग घे, हुतात्मा मनोज पांडेंचं शेवटचं पत्र वाचून येईल डोळ्यात पाणी )
काँग्रेस विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढेल. राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्या यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे. पक्षात चैतन्य निर्माण झाले आहे. त्याचा फायदा विधानसभेला होईल असेही ते म्हणाले. दरम्यान मविआमध्ये मोठा भाऊ कोण याबाबत आपण काही बोलणार नाही असे कदम म्हणाले. मात्र जो निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घ्यावा असेही त्यांनी सांगितले.