Ajinkya Rahane : मुंबईच्या रणजी टीमचा कॅप्टन अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. ऑस्ट्रेलियात 2020-21 मध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीमचा अजिंक्य कॅप्टन होता. पण, काही महिन्यांपूर्वी झालेल्या या सीरिजसाठी अजिंक्यचा विचार करण्यात आला नाही.
अजिंक्य रहाणेनं 'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. मुळचा डोंबिवलीकर असलेल्या अजिंक्यचा टीम इंडियातील प्रवास सहज झालेला नाही. त्यासाठी त्यानं आणि त्याच्या कुटुंबीयांनी मोठा संघर्ष केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजिंक्यनं या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ' मी डोंबिवलीहून येत असे. रेलेवेचा प्रवास माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता. माझ्या वडिलांना ऑफिसला जानं लागत असे. त्यामुळे मी 8 व्या वर्षांपासून एकटाच रेल्वेनं प्रवास करत असे. मी कनिष्ठ मध्यवर्गीय कुटुंबातून येतो. माझ्या वडिलांचा पगार खूप नव्हता. त्यामुळे माझी आई पैसे कमावण्यासाठी दुसऱ्यांची मुलं सांभाळात असे. त्या सर्व आठवणी आजही माझ्या मनात आहेत. मला जमिनीशी जोडलेले राहणे आवडते. मला नाव आणि प्रसिद्धी या खेळामुळेच मिळाली आहे.'
तरुण खेळाडूंना सल्ला
अजिंक्यनं यावेळी तरुण खेळाडूंबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 'मला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करायला आवडत नाही. पण, कॅप्टन म्हणून काही गोष्टी सांगाव्या लागल्या तर मी त्या नक्की सांगेन. मी अनेक गुणवान खेळाडू चुकीची निवड आणि चुकीच्या मित्रांमुळे भरकटलेले पाहिले आहेत. आपण कुठून आलो आहोत, हे विसरु नका. अनेकदा खेळाडू चांगलं खेळत असताना अनेक जण त्यांच्याभोवती तुम्हाला दिसतील. त्यांचा फॉर्म हरपल्यानंतर अचानक काही जण गायब होतात. त्यामुळे तुमचे खरे मित्र कोण? हे समजणे आवश्यक आहे,' असं अजिंक्यनं सांगितलं.
( नक्की वाचा : EXPLAINED : RCB नं IPL 2025 साठी विराट कोहलीची कॅप्टन म्हणून निवड का केली नाही? )
अजिंक्यची कारकिर्द
अजिंक्य रहाणेनं टीम इंडियाकडून 85 टेस्ट खेळल्या आहेत. त्यामध्ये 38.46 च्या सरासरीनं 5077 रन केले आहेत. त्यामध्ये 12 सेंच्युरी आणि 36 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. अजिंक्यला आजही टीम इंडियामध्ये पुनरागमन होईल, अशी आशा आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर आपण पुन्हा टेस्ट टीममध्ये परतू असा विश्वास अजिंक्यनं या मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे. मी अजूनही रणजी खेळतोय. मुंबईसाठी माझं सर्वस्व देण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय टीममध्ये पुनरागमन करणे हे माझं लक्ष्य आहे, असं अजिंक्यनं सांगितलं.
अजिंक्यच्या नेतृत्त्वामध्ये मुंबईची टीम रणजी स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. हरयणाविरुद्ध झालेल्या क्वार्टर फायनलमधील मुंबईच्या विजयामध्ये अजिंक्यच्या सेंच्युरीचा निर्णायक वाटा होता. आता मुंबईची सेमी फायनलमध्ये लढत विदर्भाविरुद्ध होणार आहे.