India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट टीमचा 'पळपुटेपणा' पुन्हा एकदा समोर आला आहे. भारताविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानने पत्रकार परिषद रद्द केली आहे. आयसीसीने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना न हटवण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याआधीच एक नवीन वाद निर्माण झाला आहे
आशिया कप 2025 च्या सुपर फोरमधील भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने प्रसारमाध्यमांशी संवाद न साधण्याचा निर्णय घेतला आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सामनाअधिकारी "पायक्रॉफ्ट यांची नियुक्ती आणि हस्तांदोलन न करण्याच्या वादावरील प्रश्नांना टाळण्यासाठी पाकिस्तानने पत्रकार परिषद रद्द केली आहे."
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वारंवार मागणी करूनही, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारत-पाकिस्तान यांच्यातील रविवारी होणाऱ्या हाय-व्होल्टेज आशिया कप सुपर 4 सामन्यासाठी पुन्हा एकदा आपल्या एलिट पॅनेलचे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांचीच नियुक्ती केली आहे. एका सूत्राने PTI ला सांगितले की, "भारत-पाकिस्तान सामन्यासाठी अँडी पायक्रॉफ्ट हेच मॅच रेफरी असतील."
रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी पंच आणि रेफरींच्या यादीची अद्याप सार्वजनिक घोषणा करण्यात आलेली नाही. स्पर्धेतील दुसरे मॅच रेफरी वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार रिची रिचर्डसन आहेत.
काय आहे वाद?
गेल्या रविवारी पायक्रॉफ्ट हेच मॅच रेफरी होते, जेव्हा भारतीय संघाने धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन केले नव्हते, मात्र नाणेफेकीच्या वेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथेचे पालन न केल्यामुळे झिम्बाब्वेच्या या अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी पाकिस्ताननं केली होती. पाकिस्तान संघाने ICC ला दोन ईमेल पाठवले होते, पहिल्यामध्ये पायक्रॉफ्टला स्पर्धेतून काढून टाकण्याची विनंती केली होती आणि नंतर त्याला त्यांच्या सामन्यांमधून वगळण्यास सांगितले होते.
ICC ने आपल्या एलिट पॅनेलच्या रेफ्रीच्या मागे ठामपणे उभे राहून या दोन्ही मागण्या स्पष्टपणे फेटाळून लावल्या.
पायक्रॉफ्ट यांनी 'स्पिरिट ऑफ द गेम' (खेळभावनेचा) कोडचे उल्लंघन केले, असा PCB चा दावा ICC ने फेटाळून लावला. ते फक्त एक 'संदेशवाहक' होते, असे ICC ने म्हटले आहे.
त्यानंतर ICC ने पायक्रॉफ्ट आणि पाकिस्तान संघाचे कर्णधार सलमान अली आगा, मुख्य प्रशिक्षक माईक हेसन आणि व्यवस्थापक नवीद अक्रम चीमा यांच्यात एक बैठक आयोजित केली होती, ज्यात त्यांनी "गैरसमजाबद्दल खेद व्यक्त केला" असं सांगण्यात आले होते.
ICC ने दुसऱ्या एका ईमेलमध्ये स्पष्ट केले की, पायक्रॉफ्टने कधीही माफी मागितली नाही, तर फक्त "गैरसमजाबद्दल खेद व्यक्त केला" आणि 'प्लेअर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरिया' (PMOA) संबंधित प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोपही PCB वर केला, जो त्यांनी नाकारला होता.