Sanju Samson News : सप्टेंबर महिन्यांत होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2025) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या टीमचा सूर्यकुमार यादव कॅप्टन आणि शुबमन गिल व्हाईस कॅप्टन आहे. शुभमन गिलचे T20I संघात पुनरागमन झाल्यामुळे काही खेळाडूंना संघाबाहेर बसावे लागले. यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांना संघात स्थान मिळाले नाही. त्याचबरोबर गिलच्या पुनरागमनाचा फटका संजू सॅमसनलाही सहन करावा लागू शकतो.
काय आहे कारण?
महान भारतीय क्रिकेटपटू आर. अश्विनने संजू सॅमसनला आशिया कप स्पर्धेत बेंचवर बसावं लागेल, असा अंदाज व्यक्त केलाय. आपल्या YouTube चॅनलवरील एका व्हिडिओमध्ये, अश्विनने जैस्वाल आणि अय्यर यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली, ज्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे, त्यांना बीसीसीआयच्या निवड समितीने घेतलेल्या निर्णयामागील कारणे समजावून सांगितली असतील, अशी आशा अश्विननं व्यक्त केली.
( नक्की वाचा : Shreyas Iyer :'त्याची काही चूक नाही,आमचीही नाही' श्रेयस अय्यरचा समावेश न होण्याचं अजित आगरकरनं सांगितलं कारण )
अश्विन आपल्या 'Ash Ki Baat' या YouTube चॅनलवर म्हणाला, "पाहा, मला माहिती आहे की निवड करणे हे एक अवघड काम आहे. कुणालातरी वगळणे, एखाद्या खेळाडूला तुला वगळले आहे असे सांगणे सोपे नाही. तुम्हाला खेळाडूंशी बोलावे लागते, त्यांच्या दुःखातून जावे लागते. मला आशा आहे की श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांना फोन केला असेल आणि त्यांना निवड न करण्यामागे कारण सांगितले असेल."
"मी शुभमन गिलची निवड का झाली हे समजू शकतो. तो व्हाईस कॅप्टन आहे. त्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी भरपूर रन्स केल्या आहेत. T20I संघात निवड होण्यासाठी त्याच्याकडे गुणवत्ता आहे," असेही तो म्हणाला.
अश्विननं सांगितलं की, "जेव्हा तुमच्याकडे T20 विश्वचषक 2024 मध्ये यशस्वी जैस्वाल तिसरा सलामीवीर म्हणून होता, तेव्हा त्याला वर्ल्ड कप काढून शुभमन गिलला आणले. म्हणजे, ठीक आहे, मी शुभमनसाठी आनंदी आहे, पण मला यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यरसाठी खूप वाईट वाटत आहे. या दोन मुलांवर हे अन्यायकारक आहे."
( नक्की वाचा : Vinod Kambli : विनोद कांबळीची तब्येत अद्यापही चिंताजनक, भावानं फॅन्सना केलं प्रार्थना करण्याचं आवाहन )
अश्विन म्हणाला, "जैस्वालही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कदाचित ते शुभमन गिलला भविष्यातील कॅप्टन म्हणून पाहत असतील. कदाचित तो तिन्ही फॉरमॅटमध्ये कॅप्टनही होऊ शकतो. पण तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कॅप्टन असणे आवश्यक नाही."
गिलला व्हाईस कॅप्टन म्हणून बढली मिळाल्यानं त्याची प्लेईंग XI मध्ये जागा नक्की आहे. त्यामुळे, शुबमन अभिषेक शर्मासोबत भारतासाठी सलामीला खेळेल, ज्यामुळे व्यवस्थापनाला संजू सॅमसनला बेंचवर बसवावे लागू शकते.
"याहूनही वाईट गोष्ट म्हणजे, तुम्ही गिलला उपकर्णधार म्हणून घोषित केले आहे, त्यामुळे संजू सॅमसनच्या स्थानालाही धोका आहे. संजू खेळणार नाही. शुभमन गिल खेळणार, आणि तोच ओपनिंगला बॅटिंग करेल," असा दावा अश्विनने केला.