Champions Trophy 2025 India vs Pakistan: ICC ची बहुप्रतिक्षित स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी ही 2025 साली आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठीचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जारी केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वेळापत्रकापेक्षा भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार की नाही याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले आहे. या वेळापत्रकातून या प्रश्नाचे उत्तर क्रिकेटप्रेमींना मिळण्याची शक्यता असल्याने या वेळापत्रकाची मोठी उत्सुकता आहे. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात करण्यात येणार असून भारताने पाकिस्तानात सामने खेळणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच विराट कोहलीचे 'अच्छे दिन' परत येणार? दोघांमध्ये आहे जबरदस्त कनेक्शन!
असे सांगितले जात आहे की 11 नोव्हेंबर रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. मात्र या वेळापत्रकात सामन्यांचे ठिकाण सांगितले जाणार नाही असे कळते आहे. सामन्यांच्या ठिकाणांविषयी नंतर माहिती दिली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाने मैदानांचे रुपडे चकचकीत करण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे सामन्यांच्या ठिकाणांचा तपशील नंतर जाहीर केला जाणार असल्याचे कळते आहे.
नक्की वाचा : 16 मुलं.. वाह! पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या कुटुंबाची कॉमेंट्रीदरम्यान थट्टा, वासिम अक्रमही सहभागी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजकत्व पाकिस्तानला मिळाले आहे. बीसीसीआयने आधीच जाहीर केले होते की भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. जर सगळे सामने पाकिस्तानात होणार असतील तर बीसीसीआय काय भूमिका घेणार याकडेही क्रिकेटविश्वाचे लक्ष असेल. चॅम्पिअन्स ट्रॉफी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित केली जाणार आहे. 19 फेब्रुवारीला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे तर 9 मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे सगळे सामने हे लाहोरमध्येच आयोजित केले जातील असे सांगितले जात आहे. ICC चे प्रतिनिधी मंडळ 10-12 नोव्हेंबर दरम्यान लाहोरला भेट देणार आहे. याच दौऱ्यादरम्यान स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले असून 'ग्रुप ए'मध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेशचा समावेश असेल. 'ग्रुप बी'मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा संघ असेल. स्पर्धेमध्ये 8 संघ एकूण 15 सामने खेळणार आहेत. या स्पर्धेसाठी लाहोर, कराची आणि रावळपिंडी ही तीन शहरे निवडण्यात आली आहेत.