फेब्रुवारी महिन्यात सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. तब्बल तीन तास झालेल्या बैठकीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी टीमची घोषणा केली. या टीममध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरचा (Karun Nair) समावेश करण्यात आलेला नाही. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी नायरचा समावेश का केला नाही याचं कारण सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नायरनं विजय हजारे स्पर्धेत विदर्भाकडून खेळताना धावांचा डोंगर रचला आहे. त्यानं या स्पर्धेत सलग चार सेंच्युरी झळकावल्या. त्याच्या खेळीच्या जोरावरच विदर्भानं या स्पर्धेच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच प्रवेश केला आहे.
नायरनं या स्पर्धेतील 9 सामन्यात 5 सेंच्युरी आणि 1 हाफ सेंच्युरीच्या जोरावर 752 रन काढले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो या 9 सामन्यांमध्ये एकदाही आऊट झालेला नाही. त्यामुळे त्याची सरासरी तब्बल 752 आहे.
( नक्की वाचा : Champions Trophy 2025 : सूर्या ते संजू ! चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचं 4 खेळाडूंचं स्वप्न भंग )
टीमममध्ये का समावेश नाही?
करुण नायरचा चॅम्पियन्स ट्रॉफी नाही तर किमान भारत विरुद्ध इंग्लंड वन-डे सीरजसाठी तरी टीममध्ये समावेश होईल, अशी अनेकांना आशा होती. निवड समितीनं यावेळी आगामी वन-डे सीरिजसाठी देखील टीम जाहीर केली. त्यामध्येही नायरला निराशा सहन करावी लागली.
नायरची टीममध्ये का निवड करता आली नाही याबाबत अजित आगरकरनं स्पष्टीकरण दिलं आहे. या विषयावर बोलताना आगरकर म्हणाला की, '750 पेक्षा जास्त सरासरी ही अद्भूत आहे. या प्रकाराची कामगिरी नेहमी होत नाही. पण, टीममध्ये फक्त 15 जागा असल्यानं प्रत्येकाचा टीममध्ये समावेश करता येत नाही.' टीम इंडियातील प्रत्येक जागेसाठी मोठी स्पर्धा आहे, असं आगरकरनं यावेळी सांगितलं.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा