Chinnaswamy Stadium Stampede: तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुनं (RCB) मंगळवारी आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. या विजयानंतर बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीची विजय परेड आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परेडपूर्वी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, ज्यात एका महिलेसह 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 50 जण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. चेंगराचेंगरीमुळे आरसीबीच्या विजयोत्सवाताला गालबोट लागलं आहे. या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रमुख मुद्दे वाचा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरसीबीच्या विजयोत्सवाला गालबोट लागलं आहे बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) च्या विजय परेडमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेसह 11 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
या चेंगराचेंगरीत 50 जण जखमी झाले. गर्दीत एक लहान मूलही बेशुद्ध पडले, ज्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर घडली.
आरसीबीचा संघ विजयाचा जल्लोष करत होता. त्यावेळी हजारो फॅन्स तिथे उपस्थित होते. ते आयपीएल 2025 च्या विजेता संघाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. त्याचवेळी गर्दीत अचानक चेंगराचेंगरी सुरू झाली.
चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटजवळ ही चेंगराचेंगरी झाली. चिन्नास्वामी स्टेडियममधील आरसीबीच्या विजय परेडसाठी फॅन्सची मोठी गर्दी जमली होती. गर्दी नियंत्रणादरम्यान पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
याच दरम्यान हलका पाऊसही सुरू झाला. पावसामुळे लोक इकडे तिकडे धावू लागले. पावसानंतर काही वेळाने चिन्नास्वामी स्टेडियमच्या मुख्य गेटजवळ चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली.