IPL 2026 DC vs PBKS: आयपीएल 2026 मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर केएल राहुल नावाचं वादळ आलं आणि पंजाब किंग्सचे बॉलर त्यात पालापाचोळ्यासारखे उडून गेले. दिल्ली कॅपिटल्सच्या या ओपनर बॅटरने पंजाबविरुद्ध केवळ 47 बॉल्समध्ये सेंच्युरी झळकावत क्रिकेट विश्वात धमाका केला. राहुल इथेच थांबला नाही, तर त्याने 67 बॉल्समध्ये नाबाद 152 रनची खेळी साकारली. या ऐतिहासिक खेळीने राहुलने असे काही रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत, जे आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही बॅटरला जमलेले नाहीत.
दिल्लीत राहुलचा धमाका आणि नशिबाची साथ
या मॅचमध्ये नशिबानेही राहुलला पूर्ण साथ दिली. डावाच्या सुरुवातीलाच अर्शदीप सिंहच्या बॉलवर शशांक सिंहने राहुलचा कॅच सोडला. त्यानंतर 51 रनवर असताना पंजाबकडे त्याला आऊट करण्याची दुसरी संधी होती, पण तीदेखील त्यांनी गमावली. या दोन जीवदानांनंतर राहुलने मागे वळून पाहिलेच नाही. त्याने आपल्या 152 रनच्या खेळीत 16 फोर आणि 9 उत्तुंग सिक्सर्स मारले. सुमारे 227 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत त्याने दिल्लीच्या होम ग्राउंडवर चौफेर फटकेबाजी केली.
( नक्की वाचा : IPL 2026: मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलणार? हार्दिक पंड्याची जागा घेण्यासाठी 'हे' स्टार्स रेसमध्ये सर्वात पुढे )
भारतीय बॅटर म्हणून आयपीएलमधील सर्वोच्च स्कोअर
केएल राहुल आता आयपीएल आणि टी20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा भारतीय बॅटर बनला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड अभिषेक शर्माच्या (141 रन) नावावर होता. इतकेच नाही तर आयपीएलच्या इतिहासातील हा तिसरा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर ठरला आहे. आता राहुलच्या पुढे फक्त ख्रिस गेल (175) आणि ब्रेंडन मॅक्युलम (158) हे दोनच दिग्गज आहेत. टी20 क्रिकेटमध्ये 150 पेक्षा जास्त रन करणारा तो तिलक वर्मानंतरचा केवळ दुसरा भारतीय ठरला आहे.
राहुलने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. अवघ्या 26 बॉल्समध्ये त्याने हाफ सेंच्युरी पूर्ण केले. त्यानंतर तो अधिकच आक्रमक झाला. 14 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहला तीन चौके आणि एक सिक्स मारत लगावत नव्वदी ओलांडली आणि पुढच्याच ओव्हरमध्ये चौका मारून आपली सेंच्युरी पूर्ण केली. राहुलने आपली ही सेंच्युरी 50 पेक्षा कमी बॉल्समध्ये पूर्ण केली, जी त्याच्या आयपीएल करिअरमधील सर्वात वेगवान सेंच्युरी ठरली आहे. दिल्लीच्या टीमसाठी सर्वात वेगवान सेंच्युरी झळकावणारा तो आता पहिला बॅटर बनला आहे.
तीन वेगवेगळ्या टीम्ससाठी रेकॉर्डब्रेक कामगिरी
केएल राहुलने या मॅचमध्ये एक असा रेकॉर्ड केला आहे जो आयपीएल इतिहासात कोणीही करू शकलेले नाही. तीन वेगवेगळ्या टीम्सकडून खेळताना प्रत्येकी 2 किंवा त्यापेक्षा जास्त सेंच्युरी झळकावणारा तो पहिलाच बॅटर ठरला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी 2, पंजाब किंग्ससाठी 2 आणि लखनऊ सुपर जायंट्ससाठी 2 सेंच्युरी पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक सेंच्युरी करण्याच्या बाबतीत त्याने ख्रिस गेलची (6 सेंच्युरी) बरोबरी केली आहे. या यादीत आता त्याच्या पुढे फक्त विराट कोहली (8) आणि जोस बटलर (7) आहेत.