गंभीर आरोप अन् FIFA World Cup मधून हकालपट्टी; रेफरी रॉब डीपरिंक यांच्या मृत्यूने क्रीडाविश्वात हळहळ

Referee Rob Dieperink Dies: फुटबॉल जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. नेदरलँड्सचे प्रसिद्ध फुटबॉल पंच रॉब डीपरिंक यांचा वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी संशयास्पद मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Referee Rob Dieperink Dies: आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून एक अत्यंत खळबळजनक वृत्त समोर आले आहे. नेदरलँड्सचे नामाँकित अम्पायर रॉब डीपरिंक (Rob Dieperink) यांचा मृत्यू झाला आहे. ते 38 वर्षांचे होते. चालू असलेल्या '2026 फिफा विश्वचषक' स्पर्धेसाठी त्यांची व्हीएआर संघात निवड करण्यात आली होती. मात्र, एका मोठ्या वादामुळे विश्वचषक सुरू होण्यापूर्वी एक महिना आधीच त्यांना या संघातून तडकाफडकी काढून टाकण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

विश्वचषकातून का काढले होते बाहेर?

रॉब डीपरिंक यांना लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या गंभीर आरोपानंतर फिफाने त्यांना विश्वचषकाच्या पंच चमूतून तात्काळ बाहेर केले. पुराव्यांच्या अभावी नंतर हे प्रकरण आणि खटला बंद करण्यात आला असला, तरी या विवादामुळे त्यांना विश्वचषकात काम करण्याची मोठी संधी गमवावी लागली होती.

Advertisement

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना डीपरिंक यांनी डच वृत्तपत्र 'डी टेलिग्राफ'शी बोलताना तीव्र दुःख व्यक्त केले होते. "माझ्यावर खोटे आरोप झाले याचे मला प्रचंड दुःख आहे. मी सुरुवातीपासूनच पोलीस तपासाला पूर्ण सहकार्य केले आणि फिफा (FIFA), युएफा (UEFA) आणि केएनव्हीबी (KNVB) यांनाही संपूर्ण सत्य माहिती दिली होती," असे त्यांनी म्हटले होते. विश्वचषकातून वगळल्यामुळे ते कमालीचे निराश झाले होते.

KNVB आणि FIFA कडून दुःख व्यक्त

डच फुटबॉल असोसिएशनने (KNVB) अधिकृत निवेदन जारी करून डीपरिंक यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "रॉब डीपरिंक यांच्या निधनाने आम्हाला मोठा धक्का बसला असून आम्ही अत्यंत दुःखी आहोत. रॉब यांच्या रूपाने आम्ही एक अत्यंत उत्कृष्ट पंच, पण त्याहूनही अधिक एक सहकारी गमावला आहे," असे KNVB ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच, फुटबॉलची जागतिक सर्वोच्च संस्था असलेल्या 'फिफा'नेही (FIFA) शोक व्यक्त केला आहे.

(नक्की वाचा-  KDMC News: कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ! जलशुद्धीकरण केंद्रातील संतापजनक VIDEO समोर)

रॉब डीपरिंक यांचा प्रवास

रॉब डीपरिंक हे नेदरलँड्समधील सर्वात प्रतिष्ठित फुटबॉल अधिकार्‍यांपैकी एक होते. 2017 पासून ते नेदरलँड्सची सर्वोच्च फुटबॉल लीग 'इरेडिव्हिझी' मध्ये पंचाची भूमिका बजावत होते. याशिवाय, 2024 मधील युरोपियन चॅम्पियनशिप (Euro 2024) दरम्यान त्यांनी व्हीएआर पंच म्हणून अत्यंत उत्कृष्ट काम केले होते. त्यांची कामगिरी पाहता त्यांची 2026 च्या विश्वचषकासाठी निवड झाली होती, परंतु एका वादामुळे त्यांचा हा प्रवास अचानक थांबला आणि आता त्यांचा अकाली मृत्यू झाला.


Topics mentioned in this article