जाहिरात

15 व्या वर्षापासून पत्रकारिता अन् तब्बल 18 वर्ल्ड कपचा अनुभव; 91 वर्षांच्या पत्रकारासमोर मेस्सीचे कोच नतमस्तक!

FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्ड कप 2026 च्या दरम्यान एका अशा व्यक्तीची चर्चा सुरू आहे ज्याने मैदानावर नाही तर प्रेस बॉक्समध्ये राहून इतिहास रचला आहे.

15 व्या वर्षापासून पत्रकारिता अन् तब्बल 18 वर्ल्ड कपचा अनुभव; 91 वर्षांच्या पत्रकारासमोर मेस्सीचे कोच नतमस्तक!
FIFA World Cup 2026: त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 18 वर्ल्ड कप कव्हर करण्याचा अद्भूत पराक्रम केला आहे.
मुंबई:

FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्ड कप 2026 सध्या सुरु आहे. फुटबॉलच्या या महाकुंभातील मैदानावरील आणि मैदानाच्या बाहेरचे किस्से नेहमीच फॅन्सचे लक्ष वेधून घेतात, मात्र फिफा वर्ल्ड कप 2026 च्या दरम्यान एका अशा व्यक्तीची चर्चा सुरू आहे ज्याने मैदानावर नाही तर प्रेस बॉक्समध्ये राहून इतिहास रचला आहे. अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी एका सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत चक्क एका 91 वर्षांच्या ज्येष्ठ पत्रकाराचा विशेष सन्मान केला. 

एन्रिके माकाया मार्केझ असे या दिग्गज पत्रकाराचे नाव असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 18 वर्ल्ड कप कव्हर करण्याचा अद्भूत पराक्रम केला आहे. त्यांचा हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून क्रीडा पत्रकारितेच्या एका सुवर्ण युगाचा गौरव मानला जात आहे.

कोचने मोडला पत्रकार परिषदेचा नियम

फिफा वर्ल्ड कप 2026 मधील अर्जेंटिनाच्या एका सामन्यापूर्वी  पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.अर्जेंटिनाच्या फुटबॉल टीमचे  कोच लिओनेल स्कालोनी यांनी या पत्रकार परिषदेत पहिला प्रश्न विचारण्याचा मान यांनी एन्रिके माकाया मार्केझ यांना दिला. मार्केझ यांनी प्रश्न विचारण्यापूर्वी स्कालोनी यांनी त्यांच्या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक कारकिर्दीचा गौरव केला.

( नक्की वाचा : FIFA World Cup 2026: नॉर्वेच्या टीमचे Viking Row celebration संपूर्ण जगभर viral, जाणून घ्या काय आहे अर्थ? )

स्कालोनी म्हणाले की, तुमच्या एका प्रश्नाचे उत्तर देणे हे माझ्यासाठी खूप मोठे भाग्य आणि आनंदाची गोष्ट आहे. हा प्रश्न तुम्ही विचारला आहे म्हणूनच मी याचे उत्तर देत आहे, तुम्ही या वर्ल्ड कपचा मनमुराद आनंद घ्या. मुख्य प्रशिक्षकांचे हे शब्द ऐकून मार्केझ यांच्या चेहऱ्यावर गोड हसू आले आणि त्यांनी, माझ्यासाठी एवढे पुरेसे आहे, असे उत्तर दिले. हा भावनिक क्षण संपल्यानंतर स्कालोनी स्वतः मार्केझ यांच्याजवळ गेले, त्यांना मिठी मारली आणि एकत्र फोटोही काढले.

1958 पासून सुरू झाला ऐतिहासिक प्रवास

एन्रिके माकाया मार्केझ यांचा फिफा वर्ल्ड कपसोबतचा हा ऋणानुबंध तब्बल सात दशकांचा आहे. अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्स येथे 1934 मध्ये जन्माला आलेल्या मार्केझ यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी रेडिओ रिवादव्हिया या वृत्तवाहिनीतून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली होती. त्यानंतर वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी 1958 मध्ये स्वीडन येथे झालेला वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी पहिला परदेशी दौरा केला होता. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 68 वर्षांत झालेल्या प्रत्येक फिफा वर्ल्ड कपमध्ये त्यांनी हजेरी लावली असून ते अर्जेंटिनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वात ज्येष्ठ आणि प्रसिद्ध आवाज बनले आहेत.

फिफाकडूनही मोठा गौरव

यापूर्वी कतारमध्ये झालेल्या 2022 च्या वर्ल्ड कपदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघ (AIPS) आणि फिफा यांनी मार्केझ यांचा विशेष सन्मान केला होता. त्यावेळी 17 वर्ल्ड कप कव्हर करणारे जगातील एकमेव पत्रकार म्हणून त्यांच्या नावावर विक्रमाची नोंद झाली होती. आता जून 2026 मध्ये आपल्या 18 व्या वर्ल्ड कपचे काम सुरू करताना दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघ म्हणजेच कॉनमेबॉलनेही त्यांना मानवंदना दिली आहे. 

फुटबॉलच्या आठवणी आणि भावना पिढ्यानपिढ्या पोहोचवणारे व्यक्तिमत्त्व अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला आहे. फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फँटिनो यांनीही मार्केझ यांच्या या कामगिरीचे कौतुक करताना हा पराक्रम खरोखरच अविश्वसनीय असल्याचे म्हटले आहे. मार्केझ यांनी 1985 ते 2009 या काळात फुटबॉल डी प्राइमेरा हा प्रसिद्ध टीव्ही शो देखील होस्ट केला होता.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com