FIFA World Cup 2026 Free Live Streaming: फिफा वर्ल्ड कप 2026 ला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश या स्पर्धेचे यजमान आहेत. या 48 देशांच्या स्पर्धेत एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत.भारतीय संघ या विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नसला, तरी भारतातील क्रीडाप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता आणि क्रेझ आहे. त्यामुळे हा वर्ल्ड कप कुठे मोफत पाहाता येणार याचा शोध फुटबॉल प्रेमी घेत आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
भारतात कुठे दिसणार सामने?
फुटबॉल वर्ल्ड कप सुरु होण्याच्या 10 दिवस आधी फिफाने भारतातील प्रक्षेपणाबाबत एक मोठा करार केला आहे. फिफाने झी एंटरटेनमेंट लिमिटेडसोबत एक व्यापक करार केला असून, यामध्ये 2034 पर्यंतच्या 39 फिफा स्पर्धांच्या प्रसारणाचे हक्क झीकडे असणार आहेत.
झीने या कराराची अधिकृत रक्कम जाहीर केली नसली, तरी सूत्रांच्या माहितीनुसार, फिफाने सुरुवातीच्या किमतीत कपात करून हा बहुवर्षीय करार साधारण 60 दशलक्ष डॉलर्सच्या घरात पूर्ण केला आहे. यामुळे क्रीडाप्रेमी आता सामने पाहण्यासाठी झी5 या ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेत आहेत, तर टीव्हीवर सामने पाहण्यासाठी युनायटेड8 स्पोर्ट्स हे नवीन चॅनेल सबस्क्राईब करत आहेत.
( नक्की वाचा : FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्ड कपचे वेळापत्रक वाचा एका क्लिकवर, नोट करा तुमच्या आवडत्या टीमच्या मॅचची वेळ )
फिफाचे सामने मोफत कसे पाहावे?
अनेक क्रीडाप्रेमी पैसे खर्च करून सबस्क्रिप्शन घेत असतानाच, हा विश्वचषक अगदी मोफत पाहण्याचा एक उत्तम पर्याय देखील उपलब्ध आहे. भारतातील फुटबॉल चाहत्यांना विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाचे आणि हाय-व्होल्टेज सामने अगदी मोफत पाहता येणार आहेत. डीडी स्पोर्ट्सने या स्पर्धेतील निवडक महत्त्वाच्या सामन्यांचे विनामूल्य प्रक्षेपण करण्याचे हक्क मिळवले आहेत.
या मोफत प्रक्षेपणाच्या यादीत मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीचा सामना, सर्व 4 क्वार्टर फायनल, दोन्ही सेमी फायनल आणि अंतिम सामन्याचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना हे मुख्य सामने पाहण्यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत.
आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवरील मोफत पर्याय
भारताबाहेर काही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर फिफा वर्ल्ड कपचे सर्व 104 सामने मोफत पाहण्याची सुविधा आहे, मात्र ते भारतात थेट उपलब्ध नाहीत. यामध्ये फॉक्स वन हे सर्व सामने इंग्रजीमध्ये तर पिकॉक हे सर्व सामने स्पॅनिश भाषेमध्ये मोफत स्ट्रीम करणार आहे.
याशिवाय युट्यूब टीव्ही, डायरेक्ट टीव्ही आणि फुबो टीव्ही यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर ट्रायल किंवा पार्टनरशिप पॅकेजच्या माध्यमातून हे सामने मोफत पाहता येऊ शकतात, परंतु यासाठी काही मर्यादा आणि नियम लागू आहेत. भारतामधील चाहत्यांसाठी मात्र डीडी स्पोर्ट्स आणि झी नेटवर्क हेच अधिकृत आणि सोपे पर्याय उपलब्ध आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world