Vinod Kambli's health: टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि सचिन तेंडुलकरचा बालमित्र विनोद कांबळी सध्या आर्थिक आणि आरोग्य अशा दोन्ही संकटांना तोंड देत आहेत. गेल्या वर्षभरापासून विनोद कांबळी आजारी असून त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. त्यांच्या याच स्थितीबद्दल त्यांचा धाकटा भाऊ वीरेंद्र कांबळी यांनी एक भावुक आवाहन केले आहे. त्यांनी चाहत्यांना विनोदच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.
कांबळी गेल्या वर्षी युरिन इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हापासून ते घरीच आहेत, पण त्यांची प्रकृती अद्यापही म्हणावी तशी सुधारलेली नाही. एका पॉडकास्ट शोमध्ये बोलताना त्यांचे भाऊ वीरेंद्र यांनी विनोदच्या आरोग्याबद्दलची माहिती दिली. ते म्हणाले, “विनोद सध्या घरीच आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विनोदला बोलण्यातही खूप अडचणी येत आहेत, पण तो एक चॅम्पियन आहे आणि मला विश्वास आहे की तो नक्कीच पुनरागमन करेल. मला खात्री आहे की तो पुन्हा फिरू लागेल आणि धावू शकेल. मला त्याच्यावर खूप विश्वास आहे आणि लवकरच तुम्ही त्याला पुन्हा मैदानात पाहू शकाल अशी आशा आहे.”
(नक्की वाचा : Shreyas Iyer :'त्याची काही चूक नाही,आमचीही नाही' श्रेयस अय्यरचा समावेश न होण्याचं अजित आगरकरनं सांगितलं कारण )
वीरेंद्र यांनी पुढे सांगितले की, विनोदने अलीकडेच 10 दिवसांचा फिजिओथेरपी कार्यक्रम पूर्ण केला आहे, तसेच त्याचे संपूर्ण वैद्यकीय परीक्षणही झाले आहे. त्यात ब्रेन स्कॅन आणि इतर चाचण्यांचाही समावेश होता. सुदैवाने, या सर्व चाचण्यांचे अहवाल चांगले आले असून, कोणतीही गंभीर बाब समोर आलेली नाही. तरीही, विनोदला नीट चालता येत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याला फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची बोलण्याची स्थिती हळूहळू सुधारत आहे. “विनोदला आता तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे,” असे आवाहन वीरेंद्र यांनी चाहत्यांना केले.
(नक्की वाचा : Dhanashree Verma : 'मी फक्त रडत होते, ओरडत होते', धनश्री वर्मानं सांगितला चहलसोबतच्या घटस्फोटाचा अनुभव)
विशेष म्हणजे, विनोद कांबळी यांच्यावर दुहेरी संकट आले आहे. एकीकडे आरोग्यविषयक समस्या असताना, दुसरीकडे ते आर्थिक संकटातही ते सापडले आहेत. नुकतेच त्यांच्या पत्नी आंद्रेया हेविट यांनीही जाहीर केले होते की, त्यांनी एका वेळी विनोदपासून वेगळे होण्याचा विचार केला होता, पण आता त्यांच्या या कठीण काळात त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला.