Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या सर्वात खराब कालखंडातून जात आहे. आशिया कप, वन-डे वर्ल्ड कप तसंच T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर बांगलादेश विरुद्ध होम ग्राऊंडवर 0-2 या फरकानं सीरिज गमावण्याची नामुश्की पाकिस्तानला सहन करावी लागली. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी पाकिस्तानची टीम सध्या तयारी करत आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पिन्स ट्रॉफीचंही पाकिस्तान यजमान आहे. पाकिस्तानच्या व्हाईट बॉल क्रिकेट टीमचे हेड कोच गॅरी कस्टर्न (Gary Kirsten) यांच्यावर माजी क्रिकेटपटू बासित अली (Basit Ali) यांनं गंभीर आरोप केले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कस्टर्न राजकारणाचे भाग
गॅरी कस्टर्न आता पाकिस्तान क्रिकेट टीमच्या राजकारणाचे भाग झाले आहेत, असा गंभीर आरोप बासित अलीनं केला. यापूर्वी दोस्ती-यारी ग्रुपचा जो प्रमुख होता तो आता बदलला आहे. बाबरनं (आझम) ते पद सोडलं आहे. आता तो ग्रुप व्हाईट बॉल क्रिकेट टीमचे कोच गॅरी कस्टर्न सांभाळत आहेत,' असा दावा बासित अलीनं त्याच्या YouTube वरील ताज्या व्हिडिओमध्ये केला आहे.
यापूर्वी खेळाडू जे बोलत होते तीच भाषा आता गॅरी कस्टर्न संघाच्या बैठकीत बोलत आहेत, असा दावा अली यांनी केला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकनी यांच्याकडं शादाब खानला संधी देण्याचा प्रस्ताव मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काही जणांमुळे हे झालं आहे, असं अलीनं कुणाचंही नाव न घेता सांगितलं. प्रमुख या नात्यानं त्यांनी (नकवी) चांगल्या गोष्टींना पाठिंबा द्यायला हवा. पण ही कारस्थानी टोळी आहे, असंही अली यावेळी म्हणाला.
( नक्की वाचा : रिझवानची डबल सेंच्युरी रोखण्यासाठी कॅप्टननं केला कट? पाकिस्तानच्या खेळाडूचा मोठा दावा...)
बकरी बनवलं!
बांगलादेशनं पाकिस्ताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला. पाकिस्तानच्या या पराभवावरही बासित अलीनं जोरदार टीका केली. मी थेट सांगतो, पाकिस्तानला बकरी बनवून हरवलं. किती दिवस निवडीमध्ये मित्रांना प्राधान्य देणार आहात. हे बंद दाराआड ठीक आहे. पण, मैदानात फक्त कामगिरी लागते, असंही त्यानं स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : बांगलादेशनं बदलला 22 वर्षांचा इतिहास, घरात घुसून पाकिस्तानला लोळवलं! )
कस्टर्न यांची हकालपट्टी निश्चित
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं सर्व लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेचं पाकिस्तान यजमान आहे. या स्पर्धेनंतर गॅरी कस्टर्नची हकालपट्टी नक्की आहे, असं मला वाटतंय. त्याला नक्कीच टाटा, बाय-बाय केलं जाईल. तो आता टीमच्या राजकारणाचा भाग झाला आहे. पण, त्याचीही ट्रिक यशस्वी होणार नाही. पाकिस्तान क्रिकेट टीमनं चॅम्पिन्स ट्रॉफीत टॉप 4 मध्ये जागा मिळवली तरी ती मोठी गोष्ट असेल, असंही बासित अलीनं यावेळी सांगितलं.