टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) टीम इंडियाचा माजी कॅप्टन कृष्णमाचारी श्रीकांतवर (Kris Srikkanth) जोरदार टीका केली आहे. श्रीकांतने फास्ट बॉलर हर्षित राणा (Harshit Rana) याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या वन-डे टीममधील निवडीवर गंभीर आरोप केला होता. हर्षित गंभीरचा 'होयबा' (yes man) असल्याचा आरोप श्रीकांतनं केला होता. त्याला गंभीरनं सडेतोड उत्तर दिलंय. श्रीकांतचे हे वक्तव्य 'अयोग्य आणि लज्जास्पद' असल्याचे गंभीरने म्हंटले आहे.
श्रीकांतचा आरोप आणि गंभीरचे उत्तर
हर्षित राणाचे गौतम गंभीरसोबत चांगले संबंध हे त्याची राष्ट्रीय टीममध्ये निवड होण्याचे एकमेव कारण आहे, असा आरोप श्रीकांतने त्याच्या यूट्यूब चॅनलवर केला होता. रत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी टेस्ट जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गंभीरनं या आरोपांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
गंभीर याबाबत म्हणाला की, 'हे लज्जास्पद आहे. मी तुमच्याशी अगदी प्रामाणिकपणे बोलतो. केवळ तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी तुम्ही एका 23 वर्षीय मुलाला लक्ष्य करत आहात, हे खूप अयोग्य आहे. कारण, त्याचे वडील माजी अध्यक्ष किंवा माजी क्रिकेटपटू किंवा अनिवासी भारतीय (NRI) नाहीत. त्याने आतापर्यंत जे काही क्रिकेट खेळले आहे, ते त्याच्या स्वतःच्या बळावर खेळले आहे आणि यापुढेही तो स्वतःच्या बळावर खेळत राहील. तुम्ही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिकरित्या लक्ष्य करत असाल, तर ते योग्य नाही.
( नक्की वाचा : Hardik Pandya: हार्दिक पांड्याने दिली गुड न्यूज! नताशापासून विभक्त झाल्यानंतर ‘या' मॉडेलसोबत केले प्रेम जाहीर )
'वैयक्तिक नव्हे, कामगिरीवर टीका करा'
गंभीर यांनी टीकाकारांना खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, "तुम्ही लोकांच्या कामगिरीवर टीका करू शकता आणि त्यासाठी निवड समिती आणि प्रशिक्षक आहेत जे कामगिरीवर लक्ष ठेवतात. परंतु, तुम्ही 23 वर्षांच्या मुलाबद्दल असे बोलत असाल आणि समाजमाध्यमांवर (Social Media) ते अधिक पसरवले जात असेल, तर त्याच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याची कल्पना करा."
"भविष्यात कोणीतरी तुमच्या मुलालाही लक्ष्य करू शकेल. कोणीही कोणालाही लक्ष्य करू शकते. किमान तो 23 वर्षांचा मुलगा आहे, याची जाणीव तुम्हाला असायला हवी."
गंभीरनं यावेळी श्रीकांतला उद्देशून सांगितलं की, "तो 33 वर्षांचा मुलगा नाही. तुम्ही माझ्यावर टीका करू शकता, आणि मी ती स्वीकारू शकेन. पण 23 वर्षांचा मुलगा आहे. हे काही मान्य होणारे नाही. मला वाटते की आपण सर्वांनी भारतीय क्रिकेटप्रती नैतिक जबाबदारी बाळगली पाहिजे. भारतीय क्रिकेट माझा किंवा ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या लोकांचा नाही. ते तुमच्या सर्वांचे देखील आहे. ज्या प्रत्येक भारतीयाला भारतीय क्रिकेटची प्रगती बघायची आहे, त्यांचे आहे. त्यामुळे तुम्ही टीका करा, पण केवळ कामगिरीवर. कोणा भारतीय खेळाडूला लक्ष्य करण्यासाठी टीका करू नका. तुम्हाला कोणाला लक्ष्य करायचे असेल तर मला लक्ष्य करा, हरकत नाही."
हर्षित राणाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
दिल्लीचा क्रिकेटपटू असलेला हर्षित राणा हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा खेळाडू आहे. गंभीर केकेआरचा मेंटॉर असतानाच हर्षितचा केकेआरमध्ये उदय झाला. त्यानं गंभीरला प्रभावित केले. गंभीर यांनी गेल्या वर्षी प्रशिक्षकपद स्वीकारल्यापासून राणाने 2 टेस्ट, 5 वन-डे आणि 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेतही एक सामना खेळला होता.