Gautam Gambhir Angry with Ground Staff at Oval: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि सीरिजमधील शेवटची टेस्ट ओव्हलवर होणार आहे. टीम इंडियानं या टेस्टची तयारी सुरु केलीय. या तयारीच्या दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर ओव्हलमधील ग्राऊंड स्टाफवर चांगलाच नाराज दिसत आहे. गंभीरचा ओव्हलचे मुख्य क्युरेटर ली फोर्टिस यांच्यासोबत जोरदार वाद झालं. गंभीरनं ग्राउंड स्टाफवर बोट दाखवत "आम्ही काय करावे हे तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही," असे सांगितल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
सराव सत्रादरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की गंभीर क्युरेटरसोबत वाद घालत आहेत. यानंतर टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशू कोटक यांना मध्यस्थी करून परिस्थिती शांत करावी लागली. त्यांच्यातील वादाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, गंभीर आणि फोर्टिस सरावासाठी असलेल्या खेळपट्ट्यांच्या स्थितीवरून वाद घालत असल्याचे दिसून आले.
यानंतर बॅटिंग कोच कोटक यांनी हस्तक्षेप केला आणि फोर्टिस यांना सराव क्षेत्राच्या एका कोपऱ्यात घेऊन त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर फोर्टिस आणि गंभीर आपापल्या मार्गाने निघून गेले. गौतम गंभीर त्यानंतर पुन्हा सराव पाहण्यासाठी परत आला. मँचेस्टर कसोटीत 50 आणि 0 धावा काढणारा साई सुदर्शन सरावासाठी मैदानात सर्वात आधी पोहोचला. डावखुरा स्पिनर कुलदीप यादवनं कसून सराव केला.
( नक्की वाचा : IND vs ENG : हॅरी ब्रुकला बॉलिंग देण्याचा रडीचा डाव का खेळला? बेन स्टोक्सनं सांगितलं कारण )
गौतम गंभीरनं शेवटच्या टेस्टपूर्वी खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं काम केलं. यापूर्वी गंभीरने टीमच्या कामगिरीबद्दल बोलताना सांगितले की, "आम्ही उत्कृष्ट खेळ दाखवला आहे. आम्ही ब्रिटन दौऱ्यावर गेलो आहोत, तेव्हा आम्हाला ज्या प्रकारचा पाठिंबा मिळाला आहे, त्याचे आम्ही कौतुक करतो. आम्ही कोणतीही गोष्ट हलक्यात घेत नाही. गेल्या 5 आठवडे दोन्ही देशांसाठी खरोखरच थरारक राहिले आहेत. ज्या प्रकारचे क्रिकेट पाहायला मिळाले, त्याचा सर्व क्रिकेट फॅन्सना अभिमान वाटेल याची मला खात्री आहे.''