आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात पराभवाचे दुःख पचवणाऱ्या गुजरात टायटन्स (GT) संघासोबत रविवारी रात्री एक अत्यंत थरारक आणि भीतीदायक घटना घडली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळल्यानंतर हॉटेलकडे परतत असलेल्या गुजरात टायटन्सच्या टीम बसला अचानक आग लागली. बसमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने मदतकार्य राबवून बसमधील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली, तरी खेळाडूंना सुमारे एक तास रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले होते.
गुजरात टायटन्ससाठी अत्यंत वाईट रात्र
रविवारची रात्र गुजरात टायटन्ससाठी सर्वच पातळ्यांवर निराशाजनक आणि त्रासदायक ठरली. आधीच आयपीएलच्या महामुकाबल्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. तर पराभवाच्या पाठोपाठ टीम बसला आग लागल्यामुळे खेळाडूंमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
(नक्की वाचा- Riyan Angry on V. Sooryavanshi: 96 धावा करणाऱ्या वैभवला रियानने झापलं? RR चा कर्णधार ट्रोलर्सच्या निशाण्यावर)
गुजरात टायटन्सला अंतिम सामन्यापूर्वी अत्यंत कठीण आणि थकवणाऱ्या प्रवासाचा सामना करावा लागला होता. 27 मे रोजी हा संघ धरमशाला येथून मुल्लानपूरला पोहोचला, जिथे 29 मे रोजी त्यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध क्वालिफायर 2 सामना खेळला. त्यानंतर 30 मे रोजी खराब हवामानामुळे त्यांच्या अहमदाबादच्या विमानाला प्रचंड उशीर झाला आणि संघ शनिवारी उशिरा रात्री अहमदाबादला पोहोचला होता.
पराभवाचे कारण थकवा होता का?
अंतिम सामन्यात गुजरातने केवळ 155 धावा केल्या होत्या. संघाच्या या सुमार कामगिरीमागे खेळाडूंचा थकवा हे कारण होते का? असा प्रश्न विचारला असता, गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोळंकी यांनी सांगितले की, "आरसीबीने अतिशय उत्तम खेळ केला आणि त्यांच्या विजयाचे श्रेय आम्ही कमी करू इच्छित नाही. आम्ही कमी दिवसांत जास्त सामने खेळलो आणि खेळाडू थकले होते, असे सांगून आम्ही आमच्या पराभवाचे समर्थन करणार नाही. आमची धावसंख्या नक्कीच कमी होती, परंतु आमच्या गोलंदाजांनी ती वाचवण्यासाठी चांगली झुंज दिली. आम्ही कुठे चुकलो याचे मूल्यांकन नक्कीच करू, पण काही वेळा समोरचा संघ आपल्यापेक्षा सरस खेळतो हे मान्य करावेच लागते."