आयपीएलच्या सतराव्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. सलामीचे तिन्ही सामने गमावल्यानंतर अखेरीस मुंबईला विजयी सूर गवसला. परंतु रोहित शर्मा सोडून हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्याचा संघाचा निर्णय चाहत्यांना काहीकेल्या रुचला नाही. मुंबईचा संघ मैदानावर खेळत असताना चाहते हार्दिक पांड्याची टर उडवताना पहायला मिळाले. परंतु हार्दिकचा संघातील सहकारी इशान किशनने, लोकं हार्दिक पांड्यावर पुन्हा प्रेम करायला लागतील असं म्हणत आशावाद व्यक्त केला आहे.
हार्दिकला आव्हानांचा सामना करायला आवडतं - इशान
हार्दिकला आव्हानांचा सामना करायला आवडतं. या परिस्थितीचा सामना त्याने याआधीही केला आहे. तो असा खेळाडू नाहीये की जो स्वतःहून समोर येऊन याबद्दल भाष्य करेल. तो मैदानावर अतिशय मेहनत घेतो हे मी पाहिलेलं आहे. तो एका वेगळ्याच दर्जाचा खेळाडू आहे, असं इशान किशनने पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
अवश्य वाचा - MI vs CSK मॅचचा बदलणार इतिहास! 17 वर्षांमध्ये पहिल्यांदाच दिसणार 'हे' चित्र
मला खात्री आहे की चाहते त्याची जी टर उडवत आहेत ते तो एन्जॉय करत असेल. मी त्याच्यासोबत बराच वेळ घालवला आहे. तो आव्हानांसाठी नेहमी तयार असतो. तुम्ही चाहत्यांबद्दल तक्रार करु शकत नाही. ते एका अपेक्षेने सामना पहायला येतात आणि त्यांचा दृष्टीकोन हा वेगळा असतो. परंतु मी हार्दिक पांड्याला ओळखतो, त्याला अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करायला आवडतं. मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात RCB चा धुव्वा उडवण्यात मुंबईला यश आलं. परंतु या सामन्यातही चाहत्यांनी हार्दिकची टर उडवली. यावेळी विराट कोहलीने मध्यस्थी करत चाहत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
लोकं पुन्हा त्याच्यावर प्रेम करतील -
चाहते त्याला अशी वागणूक देतायत हे त्याला काही प्रमाणात आवडतंय असं दिसतंय. येणाऱ्या सामन्यांमध्ये तो बॅट आणि बॉल सोबत चांगली कामगिरी करेल आणि लोकं पुन्हा त्याच्यावर प्रेम करायला लागतील असा विश्वास इशान किशनने व्यक्त केला. तुम्ही मेहनत घेऊन चांगली कामगिरी करत असाल तर लोकंही तुमच्या मेहनतीची कदर करतात. खडतर परिस्थितीतून जात असतानाही संघासाठी दिल्या जाणाऱ्या योगदानाची दखल घेतली जाते. कधीकधी चाहते व्यक्त होताना खूप कठोर असतात, पण या गोष्टीचा तुमच्यावर काही परिणाम होत नाहीये आणि तुम्ही चांगल्या मानसिकतेत असाल तर हे चित्र बदलू शकतं. आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर परवा हे चित्र नक्कीच बदलेल.
RCB विरुद्ध सामन्यात डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिकने फलंदाजीतही आपली चमक दाखवली. यानंतर हार्दिक पांड्यासमोर ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई सुपरकिंग्जचं आव्हान असणार आहे.
अवश्य वाचा - 'तो एकतर माझी बॅट तोडतो किंवा पाय', 'या' बॉलरला 2-3 वर्षांपासून खेळला नाही सूर्या