Hardik Pandya leaves Mumbai : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आगामी आयपीएल सिझनपूर्वी टीम सोडणार अशी जोरदार चर्चा सध्या क्रिकेटविश्वात सुरु आहे. पाचवेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईसाठी आयपीएल 2026 चा सिझन निराशाजनक ठरला. या खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तसंच स्वत: हार्दिकही नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हार्दिक पुढील सिझनमध्ये कुणाकडं खेळणार याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे. हार्दिक पांड्याबद्दलची ही चर्चा सुरु असतानाच त्यानं मुंबई सोडल्याचं उघड झालं आहे.
क्रिकेट करिअरला आणखी प्रदीर्घ काळ सुरू ठेवण्यासाठी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला असून तो आता थेट बंगळुरूमध्ये स्थायिक झाला आहे. आपल्या करिअरच्या पुढील काळासाठी बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सीलेंस' (COE) ला आपले स्थायी ट्रेनिंग सेंटर बनवण्याच्या उद्देशाने हार्दिकने हा मोठा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय असतानाच असा निर्णय घेणारा तो भारताचा पहिलाच प्रमुख क्रिकेटर ठरला आहे. बीसीसीआयचे केंद्रीय मानधनप्राप्त खेळाडू सामान्यतः केवळ दुखापतीतून बरे होण्यासाठी, फिटनेस टेस्ट किंवा राष्ट्रीय शिबिरासाठीच COE मध्ये जातात, त्यामुळे हार्दिकचा हा निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
( नक्की वाचा : IND vs IRE: कधीही झालं नाही ते घडलं...आयर्लंडनं वर्ल्ड चॅम्पियनला नमवलं!वाचा टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणं )
कुठे घेतली हार्दिकनं जागा?
हार्दिक मूळचा गुजरातच्या बडोद्याचा असला तरी, गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ तो मुंबईतच राहत होता. आयपीएलमधील त्याची टीम मुंबई इंडियन्सच्या घणसोली येथील सुविधेमध्येच तो प्रामुख्याने सराव करत असे. सध्या मांडीच्या दुखापतीशी झगडत असलेला 32 वर्षांचा हार्दिक ब्रिटनविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यातून बाहेर झाला होता आणि गेल्या 6 महिन्यांत त्याने आपला जास्तीत जास्त वेळ बंगळुरूच्या COE मध्येच घालवला आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक आधीच पूर्णपणे बंगळुरूमध्ये शिफ्ट झाला असून त्याने शहराच्या बाहेरील भागात COE जवळच एक मोठी प्रॉपर्टी भाड्याने घेतली आहे.
का घेतला निर्णय?
मुंबईतील राहत्या घरापासून सराव केंद्रापर्यंतचा रोजचा प्रवास आणि तिथली ट्रॅफिक ही हार्दिकसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. मुंबईत लोअर परेल येथील घरापासून रोज सरावासाठी ये-जा करणे कठीण होत असल्याने त्याने मुंबईबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
बीसीसीआयचा केंद्रीय करारबद्ध खेळाडू असल्यामुळे त्याला COE मध्ये दुखापतीच्या उपचारापासून ते कौशल्य प्रशिक्षणापर्यंतच्या सर्व जागतिक दर्जाच्या सुविधा मोफत मिळणार आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा तो आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट किंवा राष्ट्रीय संघासोबत नसेल, तेव्हा बंगळुरूचे COE हेच त्याचे मुख्य ट्रेनिंग बेस असणार आहे.
( नक्की वाचा : शोएब अख्तरच्या घरात दिसले 26/11 च्या मास्टरमाईंडचे सहकारी, पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा जगासमोर फाटला )
हार्दिक पंड्या जोपर्यंत भारतासाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत राहील, तोपर्यंत तो बंगळुरूमध्येच राहणार असून किमान पुढील 5 ते 6 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा त्याचा इरादा आहे. सरावासाठी स्वतःच्या खिशातील पैशातून नेट बॉलर्सना मानधन देणारा हार्दिक इथे स्वतःच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे.
बीसीसीआयच्या ट्रेनिंग व्यतिरिक्त त्याला मदत करण्यासाठी त्याचे वैयक्तिक फिजिओथेरपिस्ट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच देखील COE च्या बाहेर उपलब्ध असतील. सध्या हार्दिक दुखापतीतून सावरत असून, वैयक्तिक कामासाठी घेतलेल्या काही दिवसांच्या सुट्टीनंतर तो पुन्हा सराव सुरू करेल. फिट घोषित झाल्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी त्याची निवड होणार का, याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत.