India vs England Test Series, Harshit Rana : भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून लीड्स येथे सुरू होणाऱ्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजपूर्वी टीम इंडियामध्ये बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट टीममध्ये फास्ट बॉलर हर्षित राणाचा समावेश करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच हर्षित राणाला इंग्लंडमध्येच थांबण्यास सांगितले असल्याची बातमी आली होती. स्टार स्पोर्ट्सनुसार, हर्षितची इंग्लंड विरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. हर्षितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान कसोटी पदार्पण केले होते आणि त्याने आतापर्यंत फक्त दोनच टेस्ट खेळल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुसरीकडे, क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, हर्षित अद्याप अधिकृतपणे टीम इंडियामध्ये सामील झालेला नाही. रिपोर्टनुसार, हर्षित राणा संघासोबत एक अनौपचारिक सदस्य म्हणून जोडला गेला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही खेळाडूंना फिटनेसची समस्या असल्याने त्यांच्या 'कव्हर' म्हणून राणा थांबला आहे.
फिटनेसची समस्या असलेल्या खेळाडूंची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. परंतु, राणाला केवळ बॅकअप म्हणून ठेवण्यात आले असल्याची पुष्टी झाली आहे. तो भारतीय संघासोबत मंगळवारी (17 जून) लंडनमधून पहिल्या कसोटीच्या ठिकाणाकडे, म्हणजेच लीड्सला पोहोचला. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप आणि अर्शदीप सिंग हे फास्ट बॉलर आहेत. तर नितीश कुमार रेड्डी आणि शार्दुल ठाकूर हे दोघं फास्ट बॉलिंग करु शकणारे ऑल राऊंडर आहेत.